रवी दामोदर, अकोला : अकोलेकर भाविकांना ज्यांच्या दर्शनाची आस लागून आहे त्या शेगाव निवासी श्रीसंत गजाजन महाराज यांची पालखी शहरालगतच्या भौरद येथे गुरुवारी (१४ जून) दाखल झाली. वारकऱ्यांचा हा मेळा शनिवार, १५ जून रोजी राजराजेश्वरनगरीत दाखल होणार असून, माऊलींची दर्शन घेण्यासाठी हजारो अकोलेकरांची गर्दी उसळणार आहे.
भजनी मंडळ, टाळकरी, दिंडी, अश्व व ७०० वारकऱ्यांसह शेगाव येथून १३ जून रोजी निघालेला संत श्री गजानन महाराज यांचा पालखी सोहळा त्याच दिवशी सायंकाळी अकोला जिल्ह्यातील पारस येथे दाखल झाला. औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील श्रीराम मंदिर येथे रात्रभर मुक्काम करून श्रींची पालखी शनिवारी अकोल्याच्या दिशेने मार्गस्थ झाली. सायंकाळच्या सुमारास हा पालखी सोहळा भौरद येथे दाखल झाला. गावाच्या वेशीवर ग्रामस्थांनी पालखीचे भव्य स्वागत केले. या प्रसंगी आमदार रणधीर सावरकर यांनी उपस्थित पालखीचे दर्शन घेतले. या ठिकाणी डाबकी रोड व भौरद येथील शेकडो भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले. त्यानंतर हा पालखी सोहळा गावात दाखल होऊन मुक्कामस्थळी विसावला.
आजचा मुक्काम मुंगीलाल बाजोरिया विद्यालय प्रांगणात
श्रींच्या पालखीचे स्वागत व रात्रीचा मुक्काम मुंगीलाल बाजोरिया विद्यालय प्रांगणात राहील. भक्तांना श्रींचे दर्शन व्हावे म्हणून अकोला शहराच्या मुख्य रस्त्याने श्रींच्या पालखीची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. १५ जून रोजी दुपारी तीन ते रात्री बारापर्यंत मुंगीलाल बाजोरिया विद्यालय ग्राउंडवर श्रींच्या दर्शनाची व्यवस्था आहे.