अकोला : शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांवर तसेच देशी व विदेशी दारूची अवैध विक्री करणाऱ्या अड्ड्यांवर पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या विशेष पथकाने रविवारी व सोमवारी छापेमारी केली. या ठिकाणांवरून नऊ जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
रामदास पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गवळीपुरा येथील रहिवासी बग्गाबाई हसन चौधरी हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून दारूसाठा जप्त करण्यात आला. त्यानंतर अकोट फाइल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रमेश मनोराम यादव यास ताब्यात घेऊन त्याच्याकडूनही देशी-विदेशी दारुचा साठा जप्त करण्यात आला. खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुभाष प्रकाश जाधव याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून दहा हजार रुपयांचा दारूसाठा जप्त करण्यात आला. जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवसेना वसाहत येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकून संजय खेतकर, आकाश चोर, संतोष सरप, विनोद मुंडे यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फेज क्रमांक ३ मध्ये अवैध दारू विक्री सुरू असताना मधुकर पुंडलिक इंगळे यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून दारुचा साठा जप्त करण्यात आला आहे. त्यानंतर देवचंद सुखदेव घारे, राहणार ढोणे कॉलनी शिवर यास ताब्यात घेऊन त्याच्याकडूनही देशी-विदेशी दारुचा साठा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील व त्यांच्या पथकाने केली.