अकोला - गांधीग्राम येथील पुलाला तडा गेल्याने गत सहा महिन्यांपासून गांधीग्राम-अकोट मार्ग वाहतुकीसाठी बंद आहे.त्यामुळे सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सहा महिन्याचा कालावधी उलटूनही उपाययोजना न केल्याने वंचित युवा आघाडीने रविवार, दि.१२ मार्च रोजी निषेध व्यक्त करीत आंदोलन केले.
अकोला-गांधीग्राम-अकोट मार्ग गेल्या सहा महिन्यांपासून बंद असल्यामुळे रस्त्यावरील वाहतूक ठप्प आहे. त्यामुळे सामान्य नागरिक, विद्यार्थी आणि शेतकरी त्रस्त झाले आहेत. सहा महिने उलटून देखील यासंदर्भात उपाययोजना झाली नसून, याउलट तत्पुरत्या स्वरुपाचा पूल बनवून वाहतूक सुरू करण्याचा देखावा, तसेच त्याचे श्रेय घेण्यासाठी उद्घाटन करण्यात येत असल्याचा आरोप याप्रसंगी करण्यात आला. खासदार संजय धोत्रे, अकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश भारसाकळे, अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार रणधीर सावरकर आदी लोकप्रतिनीधी हरविल्याच्या घोषणाही याप्रसंगी करण्यात आल्या. त्यांना शोधून देणाऱ्या ५१ रुपयांचे रोख बक्षीस देण्यात येईल, असे बॅनर आंदोलनामध्ये झळकविले. वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांच्या मार्गदर्शनात आंदोलन करण्यात आले.
आंदोलनात वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे, जिल्हा महासचिव राजकुमार दामोदर यांच्यासह दादाराव पवार, ॲड. प्रशिक मोरे, जिल्हा उपाध्यक्ष संतोष गवई, नितीन वानखडे, आनंद खंडारे, आशिष रायबोले, श्रीकृष्ण देवकुणबी, जिल्हा कार्यकारिणी सदस्य सुजित तेलगोटे, जय तायडे, संघटक रितेश यादव, वैभव खडसे, नागेश उमाळे, दादू लांडगे, मंगेश सवंग, विजय भटकर, दीपक ठाकूर, विकास सावळे, आकाश गवई, आकाश जंजाळ, निशांत राठोड, नंदकिशोर मापारी, अनंता इंगळे, रामदास वानखडे, अनिल वानखडे, निखिल तायडे, दीपक दरोकर, निशांत दारोकर, अमर वानखडे, रंजीत तायडे आदी उपस्थित होते.
पुर्णेच्या जलाचा महादेवाला अभिषेक
याप्रसंगी वाहतुकीसाठी बंद असलेल्या मार्गाचे काम पूर्ण होऊन अकोला-गांधीग्राम-अकोट मार्ग लवकर सामान्यांसाठी खुला होऊन वाहतूक सुरळीत सुरू होऊ दे अशी मागणी करीत अकोला वंचित बहुजन युवा आघाडीच्या जिल्हा कार्यकारणीच्यावतीने पूर्णा नदीचे पवित्र जल घेऊन महादेवाच्या पिंडीवर अभिषेक केला. तसेच हरवलेल्या लोकप्रतिनीधींना शोधून देण्याचे देवाला साकडे घातले. शोधून आणणाऱ्यास ५१ रुपयांचे बक्षिस दिले जाणार असल्याची घोषणाही याप्रसंगी करण्यात आल्या.