अकोला: एस. आर. पाटील कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनीच्या लैंगिक छळ प्रकरणामध्ये भरत राणे व मिलिंद मनवर या दोन शिक्षकांसोबतच बाल सल्लागार कल्याण मंडळाचा अध्यक्ष, तसेच पत्रकार प्रा. गणेश बोरकर आरोपी असल्याची माहिती उघड झाली आहे. खदान पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्हय़ामध्ये प्रा. गणेश बोरकर हे या प्रकरणामध्ये आरोपी असल्याचे समोर आल्याने बालकांचे संरक्षण करणार्या बाल सल्लागार मंडळाच्या अध्यक्षानेच विद्यार्थिनीचा छळ केल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला. विदर्भ ग्रामीण शिक्षण संस्थेद्वारा संचालित असलेल्या अकोला आर्ट्स कॉर्मस अँण्ड सायन्स कॉलेज म्हणजेच एस. आर. पाटील कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या एका १६ वर्षीय विद्यार्थिनीच्या गालावर, पाठीवर भरत राणे नामक शिक्षक हात फिरवायचा. यासोबतच तिच्याशी लगट साधून अश्लील संभाषण करण्याचा प्रयत्न करीत होता. महागडे चॉकलेट देण्याचे आमिष, दुचाकी घेऊन देण्याचे आमिष दाखवून तिला घरी बोलावण्यासाठी मागणी घालत होता. या प्रकाराची वाच्यता केल्यास परीक्षेत नापास करीन, तुझ्या आईला जिवे मारण्यात येईल, अशा प्रकारची धमकी देऊन या विद्यार्थिनीचा छळ सुरू केला होता. विद्यार्थिनीला छळ असहय़ झाल्यानंतर तिने या प्रकरणाची तक्रार शिक्षण संस्थेकडे करताच कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक मिलिंद सुदामराव मनवर आणि बाल सल्लागार कल्याण मंडळाचा अध्यक्ष प्रा. गणेश बोरकर या दोघांनी विद्यार्थिनीला पुन्हा धमक्या देऊन तक्रार मागे घेण्यास भाग पाडले. बोरकर हा बालकांचे संरक्षण करण्यासाठी असलेल्या समितीवर असताना त्याने संरक्षण न करता विद्यार्थिनीचा छळ केला. त्यामुळे या पीडित विद्यार्थिनीने मोठे धाडस करून तीनही शिक्षकांविरुद्ध गुरुवारी खदान पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून खदान पोलिसांनी शिक्षक भरत राणे, मिलिंद मनवर व प्रा. गणेश बोरकर या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. या लैंगिक छळ प्रकरणामध्ये बाल सल्लागार कल्याण मंडळाचा अध्यक्ष प्रा. गणेश बोरकर आरोपी असल्याचे खदान पोलिसांच्या दप्तरी नोंद करण्यात आली आहे. यामधील भरत राणे नामक शिक्षकास अटकपूर्व जामीन मिळाला असून, प्रा. गणेश बोरकर व मिलिंद मनवर या दोघांचा पोलीस शोध घेत आहेत.
बाल सल्लागार मंडळाचा अध्यक्ष गणेश बोरकर आरोपी
By admin | Published: October 07, 2015 2:05 AM