अकाेला: विघ्नहर्ता गणरायांच्या विसर्जासाठी दाेन दिवसांचा अवधी शिल्लक असून गणेश भक्तांना सुविधा देण्याच्या उद्देशातून महापालिका प्रशासन तयारीला लागले आहे. प्रशासनाने माेर्णा नदीच्या काठावर तीन ठिकाणी गणेश घाट सज्ज केले आहेत. या व्यतिरिक्त शहराच्या विविध भागात गणेश विसर्जन कुंड तयार करण्यासाठी अनेक स्वयंसेवी संघटना, माजी नगरसेवक सरसावले आहेत.
शहरात गणेशाेत्सवाला प्रदिर्घ परंपरा लाभली आहे. शहराचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वर मंदिरात विराजमान असलेल्या गणपती बाप्पांना यंदा १५१ वर्ष पूर्ण हाेत आहेत. १९ सप्टेंबर राेजी बाप्पा घराेघरी विराजमान झाल्यानंतर शहरात सर्वत्र उत्साह, चैतन्य व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. येत्या २८ सप्टेंबर राेजी गणपती बाप्पांना निराेप द्यावा लागणार आहे. शहरात बाप्पांची माेठ्या धुमधडाक्यात व वाजत गाजत मिरवणूक निघते. माेठ्या उंचीच्या गणेश मुर्तींचे शहराबाहेरील नद्यांमध्ये विसर्जन केले जाते. तसेच लहान गणेश मुर्तींच्या विसर्जनासाठी मनपा प्रशासनाकडून माेर्णा नदीच्या काठावर तीन ठिकाणी घाट सज्ज करण्यात आले आहेत. या घाटावर निर्माण केलेल्या विसर्जन कुंडात स्वच्छ पाणीपुरवठा, पथदिवे, गर्दीला सूचना करण्यासाठी लाऊडस्पिकर, निर्माल्यासाठी स्वतंत्र वाहनांची व्यवस्था व भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जात आहे.
याठिकाणी मनपाचे घाट तयारघराेघरी प्रतिष्ठापना केलेल्या गणपती बाप्पांच्या विसर्जनासाठी मनपाने महाराणा प्रताप बागेमागील माेर्णा नदीच्या काठावर मुख्य घाट तयार केला आहे. यासह हरिहरपेठ, अनिकट व हिंगणा परिसरात माेर्णा नदीच्या काठावर घाट तयार केले आहेत.
प्रभागांमध्ये विसर्जन कुंडांची निर्मितीगणेश भक्तांच्या सुविधेसाठी जुने शहरातील प्रभाग क्र.१० मध्ये माजी उपमहापाैर वैशाली शेळके यांनी जय बाभळेश्वर मंदिराच्या प्रांगणात प्रशस्त गणेश कुंडाचे निर्माण केले आहे. प्रभाग क्र. ३ व ६ मधील गणेश भक्तांसाठी मा.सभागृहनेत्या गितांजलीताई शेगोकार, मा.नगरसेवक राहुल देशमुख, हरीश काळे, सागर शेगोकार यांनी भारत विद्यालयासमाेरील छत्रपती शिवाजी महाराज क्रिडांगण येथे विसर्जन कुंड तयार केला आहे. प्रभाग १९ मधील मा.सभागृहनेत्या याेगीता पावसाळे, मा.नगरसेवक पंकज गावंडे तसेच प्रभाग २० मधील माजी उपमहापाैर विनाेद मापारी यांनी सुशाेभीत कुंडांचे निर्माण केले आहे.