अकोला: ओसंडून वाहणारा गणेश मंडळांचा उत्साह, ढोलताशे व झांज यांचा गजर, गणपत्ती बाप्पा मोरयाचा जयघोष करीत बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या... अशा गणेशभक्तांच्या आर्जवाचा स्वीकार करीत दरवर्षी येणाºया गणरायांनी रविवारी निरोप घेतला. मानाच्या बाराभाई गणपतीची विधिवत पूजा करून करून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणूकीला सुरूवात झाली. मिरवणुकीमध्ये शहरातील ४५ गणेशोत्सव मंडळ सहभागी झाले होते. पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, खासदार संजय धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधिर सावरकर, आमदार गोपीकिसन बाजोरिया,माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे, महापौर विजय अग्रवाल, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष अॅड. मोतीसिंह मोहता, कार्याध्यक्ष संग्राम गावंडे आदींनी बाराभाई गणेशाचे पूजन व महाआरती केल्यानंतर ११.१५ वाजता मिरवणूकीला सुरूवात झाली.महापालिकेच्या वतीने गणेश विसर्जनासाठी खोलेश्वर गणेश घाटावर सात कुंड सज्ज ठेवण्यात आले होते. रविवारी सकाळपासूनच गणेशभक्तांनी गणेश घाट, नीमवाडी घाट, अनिकट, हरिहरपेठ, हिंगणा रोडवरील गणेश घाटावर विसर्जनासाठी गर्दी करण्यास सुरुवात केली. सायंकाळी तर भाविकांनी अनिकट, नीमवाडी व गणेश घाटावर प्रचंड गर्दी केली होती. ही गर्दी रात्री १२.३0 वाजेपर्यंत अविरत सुरू होती. महापालिकेने याठिकाणी भाविकांच्या स्वागतासाठी स्वतंत्र कक्ष सुरु केला होता. नीमवाडी घाटावर मनपाच्या वतीने मंडप उभारुन भक्तांच्या स्वागताची तयारी केली होती. निर्माल्य टाकण्यासाठी मनपाने कंटेनरची व्यवस्था सुद्धा केली होती. बाप्पाला निरोप देण्यासाठी कुटूंबियासोबत, आई-वडीलांसोबत बच्चे कंपनीने मोठी गर्दी केली होती. चिमुकली मुले गणेश मुर्तीला हातात, डोक्यावर घेऊन विसर्जनासाठी या तिन्ही घाटावर आणत होते. सुरुवातील गणेशावी आरती, विधीवत पुजा करुन गणेशाचे विसर्जन केले जात होते. गणेश घाटावरील गर्दीच्या तुलनेत नीमवाडी घाटावर विसर्जन करणाºया भक्तांची संख्या दुप्पट होती.(प्रतिनिधी)
लाडक्या गणरायाचे आगमन प्रत्येकाला सुखावणारे असते. घराघरात आनंद आणि प्रसन्नता आणणाऱ्या बाप्पाला निरोप देताना आज प्रत्येक गणेशभक्ताचे मन धीरगंभीर झाले होते. आज आपल्या लाडक्या गणेशाने सर्वांचा निरोप घेतला, तो पुढल्या वर्षी येण्यासाठी...लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी रविवारी शहरातील गणेश घाट, अनिकट, हरिहरपेठ, हिंगणा रोड, नीमवाडी घाटावर गणेशभक्तांनी हजारोंच्या संख्येने गर्दी केली होती.
मिरवणुकीमध्ये सहभागी झालेल्या शिवशक्ती प्रतिष्ठान, लोकमान्य आखाडा, हनुमान आखाडा अनिकटच्या कार्यकर्त्यांनी तलवारबाजी, दांडपट्टा, लाठीकाठी आदी लक्षवेधी, चित्तथराथक प्रात्यक्षिके सादर केली. लेझिम पथकाने भाविकांचे लक्ष वेधून घेतले.सातव चौकात गणेश विसर्जन कुंड
नगरसेविका अॅड. धनश्री देव, नगरसेवक बबलु जगताप यांच्यातर्फे सातव चौकात गणेश भक्तांसाठी विसर्जन कुंड तयार करण्यात आले होते. तसेच निर्माल्यासाठी मनपाकडून स्वच्छतारथ होता. याठिकाणी शेकडो नागरीकांनी गणेश कुंडामध्ये मुर्तींचे विसर्जन केले.
मिरवणुकीत या मंडळाचा सहभाग
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकीत बाराभाई गणेश मंडळ, राजराजेश्वर गणेश मंडळ, जागेश्वर गणेश, खोलेश्वर शिवभक्त मंळ, रामभरोसे, गणेशोत्सव मंडळ पोळा चौक, छत्रपती गणेशोत्सव मंडळ देशमुखपेठ, श्री प्रगती गणेशोत्सव मंडळ न्यू आळशी प्लॉट, श्री गणेशोत्सव मंडळ देवरावबाबा चाळ, नवयुवक गणेशोत्सव मंडळ रतनलाल प्लॉट, हनुमान आखाडा खदान, संघर्ष गणेशोत्सव रतनलाल प्लॉट, विप्र युवा वाहिनी भाटे क्लब, श्री माळीपुरा मंडळ, हनुमान आखाडा अनिकट, जुना कापड बाजार गणेशोत्सव, त्रिमुर्ती गणेशोत्सव शास्त्री नगर, तेलीपुरा गणेशोत्सव मंडळ, उमरी रोडचा राजा, छत्रपती गणेशोत्सव शिवाजीनगर, श्रीराम प्रतिष्ठान गणेशोत्सव सुधीर कॉलनी, आदर्श गणेशोत्सव आळशी प्लॉट, अर्जुन समाज गणेशोत्सव मानेक टॉकिज, शिवराज ग्रुप बाळापूर नाका, श्री इच्छेश्वर गणेशोत्सव मंडळ गांधीनगर, श्री समाजसेवा गणेशोत्सव मंडळ डाबकी रोड, डेल्टा टीव्हीएस गणेशोत्सव मंडळ नेहरू पार्क, श्री बालक गणेशोत्सव सिंधी कॅम्प, लोकमान्य आखाडा, सिद्धी विनायक गणेशोत्सव शास्त्री नगर, आरंभ गणेशोत्सव मंडळ तोष्णीवाल लेआऊट, शिवशक्ती प्रतिष्ठान कौलखेड, श्री कल्याण गणेशोत्सव न्यू राधाकिसन प्लॉट, डाबकी रोडवासी गणेश मंडळ, क्रांतीयुवक गणेशोत्सव मंडळ रामदासपेठ, संत गजानन वारकरी मंडळ सावतराम चाळ आदी गणेश मंडळांनी सहभाग घेतला होता.