संसर्गजन्य काेराेना विषाणूचे सावट असले तरी यंदाही गणेश भक्तांनी शासनाच्या नियमावलीचे पालन करून १२ सप्टेंबर राेजी गणरायाचे स्वागत केले. शहरात घराेघरी तसेच सार्वजनिक गणेशाेत्सव मंडळांनी लाडक्या गणरायाची माेठ्या भक्तिभावाने स्थापना केली. १९ सप्टेंबर राेजी गणपती बाप्पांना निराेप द्यावा लागणार असल्याने विसर्जनासाठी महापालिका तसेच आजी, माजी नगरसेवकांनी गणेश घाट अद्ययावत केले आहेत. मनपा प्रशासनाने चार ठिकाणी गणेश विसर्जन घाट तयार केले असून यामध्ये महाराणा प्रताप बागेमागील माेर्णा नदीच्या काठावर, हरिहरपेठ, निमवाडी तसेच हिंगणा येथे नदीकाठावर व्यवस्था केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण सजले!
माजी सभागृहनेता तथा नगरसेविका गीतांजली शेगोकार, गटनेता राहुल देशमुख, नगरसेवक हरीश काळे तसेच मा. नगरसेवक सागर शेगोकार यांच्या संकल्पनेतून जठारपेठ, रामदासपेठ , तापडिया नगर, राऊत वाडी, न्यू तापडिया नगर, खरप, तसेच प्रभाग क्रमांक ६ व प्रभाग क्र.३ मधील भाविकांच्या सोयीसाठी तापडिया नगरस्थित छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर कृत्रिम तलावाचे निर्माण करण्यात आले आहे.
छत्रपती गणेश विसर्जन घाट सज्ज
प्रभाग क्रमांक २० अंतर्गत येणाऱ्या जुने खेतान नगरस्थित छत्रपती उद्यान येथे गणेश विसर्जन घाट सज्ज केला आहे. मा. स्थायी समिती सभापती तथा नगरसेवक विनाेद मापारी व मित्र मंडळाच्यावतीने गणेश भक्तांचे तुतारी, सनई चौघडा व ढोलच्या निनादात पारंपरिक पद्धतीने स्वागत केले जाइल.
शिवशक्ती गणेश घाटाची तयारी पूर्ण
प्रभाग क्रमांक १९ मध्ये मा. नगरसेवक पंकज गावंडे व मित्र परिवारच्यावतीने हिंगणास्थित शिवशक्ती गणेश घाट सुसज्ज करण्यात आला आहे. याठिकाणी नदीपात्रासह कृत्रिम घाट तयार केला असून ढाेलताशांच्या गजरात भक्तांचे स्वागत केले जाइल. सुरक्षेसाठी नदीकाठावर आठ सदस्यांची चमू उपस्थित राहील.