मूर्तीजापूर : गत दहा दिवसापासुन शहरातील सार्वजनिक गणोश मंडळांसह घरोघरी विराजमान असलेल्या गणरायाला रविवारी जड अंत:करणाने निरोप देण्यात आला. पुढच्या वर्षी लवकर या..च्या निनादात गणेश विसर्जन मिरवणुकीस दुपारी दोन वाजतापासून प्रारंभ झाला. शहरातील मानाच्या हजारी यांच्या गणपती मंदिर येथून मिरवणुकीस सुरुवात झाली. त्यासोबतच चंद्रशेखर आझाद मंडळ मलाईपुरा अशी दोन गणेशोत्सव मंडळ हे मेनरोड ने फिरून मोमिनपुरा येथील मस्जिद समोरून निघत असते. यावर्षी चंद्रशेखर आझाद गणेश मंडळाच्या वतीने मस्जिद समोर विविध फुलांच्या पाकळ्या चे उधळण करत शोभायात्रा काढली. या दरम्यान कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. सर्व शांतपणे उत्सव पार पडला. काही मंडळांनी रविवारी तर काही गणेश मंडळाच्या वतीने सोमवारी विसर्जन मिरवणुक काढली होती. उशीरा पर्यंत मिरवणूक सुरू होती. जुनी वस्ती व स्टेशन विभागात गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शहर पोलीस स्टेशन चे ठाणेदार दत्तात्रय आव्हाडे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उप निरीक्षक, कर्मचारी, एस.आर.पी,होमगार्ड, वाहतूक कर्मचारी वर्ग यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. मस्जिद समोरून निघणाº्या मिरवणूक कार्यक्रम स्थळी कपीले बंधु यांच्या वतीने भक्ततांसाठी फराळ,नाश्ता चे वितरण करण्यात आले. तर विविध ठिकाणी जाऊन विलास वानखडे यांनी थंड पाण्याचे आपल्या दुचाकी वरून वितरण केले. गणेश विसर्जन मिरवणुक शांतपणे पार पाडण्यासाठी मस्जिद समोर उपविभागीय अधिकारी तथा तहसीलदार राहुल तायडे, नायब तहसिलदार वैभव फरताडे, नगर परिषद मुख्याधिकारी विजय लोहकरे, नगरसेवक , समाजसेवक, शांतता समीती सदस्य, पत्रकार, मंडळ अधिकारी अनिल बेलाडकर, तलाठी जि.जि.भारती,विविध मंडळाचे कार्यकर्ता, मुस्लिम बांधव आदी बहुसंख्येने उपस्थित होते.