अकोला : निर्गुण निराकार असलेल्या बाप्पांची विविध रुप व आकारातील मुर्ती पहावयास मिळतात. कुणी शाडू मातीचा गणपती बनवितो, तर कुणी आणखी कशापासून गणपती बनवितो. अकोल्यातील एका दिव्यांग कलाकाराने मात्र चक्क पेन्सिलचा गणपती तयार केला आहे. विविध रंगांच्या तब्बल २५ हजार पेन्सिलचे पुडके एकावर एक रचून टिल्लू टावरी यांनी हा अनोखा बाप्पा साकारला आहे. विशेष म्हणजे या पेन्सिल चिकटविण्यात आलेल्या नसून, या पेन्सिल विशिष्ट पद्धतीने एकमेकांत घट्ट बसविण्यात आल्या आहेत. शहरातील मनकर्णा प्लाट येथील विर भगतसिंग मंडळाने या बाप्पांची प्रतिष्ठापणा केली आहे. भाविकांसाठी हा पेन्सिल बाप्पा आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. हा अनोखा गणपती बनविण्यासाठी तब्बल तीन महिन्यांचा कालावधी लागला आहे. टिल्लू टावरी हे गत ३१ वर्षांपासून विविध वस्तुंपासून गणपती बनवीत आहेत. गतवर्षी त्यांनी चलनी नोटांपासून बनविलेला गणपतीही आकर्षणाचे केंद्र ठरला होता.
अकोल्यात साकारलाय 'पेन्सिल बाप्पा'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 7:10 PM