लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अकोल्यातील गणेशोत्सवाची उलाढाल यंदा दहा कोटींच्या घरात जात असल्याची आकडेवारी समोर आली आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि मध्यम मंडळातील मूर्तींची संख्या ३८० च्या घरात पोहोचली असून, घरगुती मूर्तींची संख्या एक लाखांवर पोहोचल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.सोमवार, २ सप्टेंबर २०१९ रोजी गणेश स्थापनेची जय्यत तयारी राज्यभरात सुरू असून, दहा दिवस हा उत्सव चालणार आहे. गणेशोत्सवानिमित्त राज्यातील मोठ्या शहरांमध्ये लाखो गणेश मूर्ती आणि मंडप तयार आहेत. अकोल्यातील कौलखेड, डाबकी रोड, गुलजारपुरा, जुने शहर, जठारपेठ आदी परिसरात जवळपास १५ नामवंत मूर्तिकार असून, त्यांनी ११ ते २० फूट उंचीच्या १५ मूर्ती तयार केल्या आहे. ११ फूट उंचीच्या मूर्तीची संख्यादेखील शेकडोंच्या घरात त्या जवळपास ३८० आहेत. याशिवाय घरगुती स्वरूपात स्थापन होत असलेल्या लहान मूर्ती निर्मितीची संख्या एक लाखाच्यावर असल्याची माहिती मूर्तिकारांनी दिली आहे.अकोल्यातील विविध भागात पाचशे लहान-मोठे मूर्तिकार असून, त्यांनी या मूर्ती तयार केल्या आहेत. याशिवाय शाडू मातीच्या मूर्तींची संख्या वेगळी आहे.एका मूर्तीवर एक ते तीन-चार लाखांचा खर्च केला जातो. त्यानुसार दोन लाख रुपये एका मंडळाचा खर्च गृहीत धरला तरी, ही आकडेवारी ७ कोटी ६० लाखांच्या घरात जाते. याशिवाय घरगुती मंडळाचा खर्च किमान दोन-तीन कोटींच्या घरातील आहे. त्यामुळे अकोल्यातील गणेशोत्सव हा दहा कोटींचा झाला आहे.
हजारो लोकांना रोजगारगणेशोत्सवानिमित्त हार-फुले, नारळ, खोबराखिस, साखर, मोदक, मोतीचूर लाडू, गुलाल, अगरबत्ती, सुगंधी धूप, हळदी-कुंकू, डेकोरेशन, लाइटिंग, डीजे, साऊंड सिस्टीम, मंडप, भंडाऱ्यांवरील अन्नधान्य, ड्रेस कोड यावरही कोट्यवधींची उलाढाल होते. या उलाढालीमुळे अकोला आणि परिसरातील हजारो लोकांना रोजगार मिळाला आहे.
कुळाचाराप्रमाणे गणेश मूर्ती स्थापन करा : पुरोहित संघ४सोमवार, २ सप्टेंबर तिथी भाद्रपद श्री गणेश चतुर्थी असल्याने या दिवशी श्री गणेशाची मृण्मय मूर्तीची स्थापना व प्राणप्रतिष्ठा कुळाचाराप्रमाणे करावी, श्रीगणेशाचे षोडशोपचारे पूजन करून २१ दुर्वा, शमी, तुळशीपत्रे, लाल फुले, वाहावे, २१ मोदकांचा नैवेद्य दाखवावा, श्रीगणेशाच्या स्थापनेचे कोणतेही मुहूर्त नाही, त्यामुळे आपल्या सवडीने श्रीगणेशाची स्थापना करावी, हा निर्णय श्री समस्त ब्राह्मण पुरोहित संघ बैठकीत घेण्यात आला, अशी संतोष कुळकर्णी यांनी दिली.
गतवर्षी अकोल्यातील मोठ्या गणेशमूर्तींची संख्या ३४० होती. यंदा त्यात ४० मूर्तींची वाढ झाली आहे. धर्मादाय आयुक्त आणि महापालिकेतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची संख्या कमी असली तरी ११ फूट उंचीच्या मूर्तींची संख्या अकोल्यात मोठी आहे. लहान मंडळ आणि घरगुती मूर्तींची संख्या वेगळीच आहे.-सिद्धार्थ शर्मा,सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पदाधिकारी, अकोला.