अकाेला : अकाेल्यातील रहिवासी एका महिलेने विमान तिकीट रद्द करण्यासाठी गुगलवर हेल्पलाइन क्रमांक शाेधला असता सायबर चाेरट्यांनी या महिलेला जाळ्यात अडकवीत त्यांच्या स्टेट बँकेच्या खात्यातून तब्बल एक लाख ९९ हजार रुपयांची रक्कम पळविली हाेती. अकाेला सायबर पाेलीस स्टेशनने ही रक्कम परत मिळवून दिली असून ही रक्कम पळविणाऱ्या पश्चिम बंगाल येथील टाेळीची कुंडली गाेळा केली. त्यानंतर ही माहिती पश्चिम बंगाल पाेलिसांना दिल्यानंतर तेथील पाेलिसांनी या टाेळीतील सात जणांना अटक करून त्यांच्याकडून २२ माेबाइल जप्त केले आहेत. अकाेला सायबर पाेलिसांच्या कामगिरीमुळे ही टाेळी पाेलिसांच्या हातात लागल्याची माहिती आहे.
शहरातील रहिवासी एका महिलेने विमान तिकीट काढल्यानंतर प्रवासाची तारीख पुढे ढकलल्याने त्यांना तिकीट रद्द करण्यासाठी गुगलवर विमान कंपनीचा ग्राहक सेवा केंद्राचा हेल्पलाइन क्रमांक शाेधला. यावर संपर्क केला असता ग्राहक सेवा केंद्राच्या प्रतिनिधीने त्यांना एक ॲप डाउनलाेड करण्याचे सांगितले. यावरून त्यांनी ॲप डाउनलाेड केले असता काही वेळातच एक काेड घेऊन बनावट ग्राहक सेवा केंद्राच्या प्रतिनिधीने त्यांच्या बॅंक खात्यातील सुरुवातीला ९९ हजार ९९९ आणि नंतर एक लाख रुपये असे एकूण एक लाख ९९ हजार ९९९ रुपये ऑनलाइन पळविले. महिलेला फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी या प्रकरणाची तक्रार सायबर पाेलीस ठाण्यात केली. सायबर पाेलिसांनी क्षणाचाही विलंब न करता तपास सुरू केला असता ही रक्कम पेटीएमला वळती केल्याचे समाेर आले. त्यानंतर तातडीने पेटीएम कंपनीसाेबत संपर्क साधून या महिलेची रक्कम परत मिळवून दिली. त्यानंतर या चाेरट्यांचा शाेध घेतला असता ते पश्चिम बंगाल येथील असल्याची माहिती समाेर आली. यावरून त्या टाेळीची पूर्ण माहिती अकाेला पाेलिसांनी गाेळा करून पश्चिम बंगाल येेथील पाेलिसांसाेबत संपर्क केल्यानंतर तेथील पाेलिसांनी तातडीने सापळा रचून सात आराेपींना अटक केली. त्यांच्याकडून २२ माेबाइल व काही रक्कम जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर, अतिरिक्त पाेलीस अधीक्षक माेनीका राऊत, शहर पाेलीस उपअधीक्षक सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पाेलीस स्टेशनचे प्रशांत संदे, दीपक साेळंके, गणेश साेनाेने, ओम देशमुख, अतुल अजने यांनी केली.