अकोला : जिल्हाभरात टोळीने गुन्हे करणाऱ्या दोन जणांच्या टोळीला पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या आदेशाने जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. आतापर्यंत पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने जिल्ह्यातील सुमारे ३३ पेक्षा अधिक टोळ्यांना हद्दपार करण्यात आले आहे. या टोळीतील चारही आरोपी बुलडाणा जिल्ह्यातील डोनगाव येथील रहिवासी आहेत.
बुलडाणा जिल्ह्यातील डोणगाव येथील रहिवासी शुभम गजानन मुळे वय २२ वर्षे, राहुल बाळासाहेब देशमुख वय १९ वर्षे, अजयसिंग गणेशसिंग ठाकूर वय २० वर्षे आणि कृष्णा आदिनाथ वाडेकर वय १९ वर्षे हे चार आरोपी जिल्ह्याच्या विविध भागांत टोळीने गुन्हे करत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांना मिळाली. या माहितीवरून चारही गुन्हेगारांवरील गुन्हेगारीची मालिका पाहता पोलीस अधीक्षकांनी या चौघांविरुद्ध हद्दपारीचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले. यावरून खदान पोलिसांनी या दोन गुन्हेगारी टोळीतील ४ गुन्हेगारांविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती पोलिसांकडे सादर केली. खदान पोलीस ठाण्यासह जिल्ह्याच्या विविध भागात या टोळीने अनेक गुन्हे केल्याचे समोर आले. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक तसेच त्यांना सुधारण्यासाठी वारंवार कारवाई करण्यात आली. मात्र, चारही गुन्हेगार पोलिसांच्या या कारवाईला जुमानत नसल्याने पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या आदेशाने या दोन्ही गुन्हेगारी टोळ्यांतील चार आरोपींना जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी हा आदेश मंगळवारी दिला असून टोळीला जिल्ह्याच्या बाहेर काढण्यात आले आहे. यासाठी स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख शैलेश सपकाळ व खदान पोलीस स्टेशनचे ठाणेदार डी. सी. खंडेराव यांनी आवश्यक ती प्रक्रिया केली.