- सचिन राऊत
अकोला : जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पातुर रोडवर एका टीनाच्या मोठ्या गोदामात घरगुती गॅस सिलेंडरमधील गॅस मोटार पंपाच्या साहाय्याने वाहनांमध्ये भरून देण्यात येत असतानाच पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या विशेष पथकाने सोमवारी सकाळी छापा टाकला. या ठिकाणावरून गॅस सिलेंडर सह वाहन जप्त करण्यात आले असून दोघांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पातुर रोडवरील एका गॅरेजच्या बाजूला शिवशंकर उद्धव केंद्रे वय २५ वर्षे राहणार अंबिका नगर वाशिम बायपास व शफिक खान उर्फ राजू जमील खान राहणार अंबिका नगर वाशिम बायपास हे दोघेजण मोटार पंपाच्या सहाय्याने घरगुती गॅस सिलेंडर मधील गॅस वाहनांमध्ये भरून देत असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील यांना मिळाली. या माहितीवरून त्यांनी पथकासह या अवैध धंद्यावर पाळत ठेवून सोमवारी सकाळी छापा टाकला. यावेळी घरगुती गॅस सिलेंडरमधील गॅस ऑटो व काही वाहनांमध्ये भरण्यात येत असतानाच एकास रंगेहाथ अटक करण्यात आली. त्याच्याकडून चार गॅस सिलेंडरसह एक वाहन ताब्यात घेण्यात आले आहे.
याप्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध जुने शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील व त्यांच्या पथकाने केली.