लोकमत न्यूज नेटवर्कखेट्री : गुंगीचे औषध देऊन ३५ वर्षीय विवाहितेवर पाच जणांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना पातूर तालुक्यातील बेलुरा शिवारात २३ डिसेंबर रोजी सायंकाळी घडली. याप्रकरणी चान्नी पोलिसांनी १ जानेवारी रोजी रात्री उशिरा पाच जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून मुख्य आरोपीस अटक केली.आरोपीस पोलिसांनी जिल्हा व सत्र न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यास ६ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.पातूर तालुक्यातील दिग्रस बु. येथील सोपीनाथ महाराजांच्या मंदिराजवळ तुलंगा येथील ३५ वर्षीय विवाहिता २३ डिसेंबर रोजी सायंकाळी उभी होती. यावेळी तेथे मोहम्मद हारुल शे. अकबर रा. वाडेगाव हा तेथे दुचाकीने आला. त्याने विवाहितेला दुचाकीने घरी सोडून देण्याच्या बहाण्याने नेले. तेथून बेलुरा शिवारात एक कार उभी होती. या कारमध्ये चार युवक आधीच बसलेले होते. तेथे गेल्यानंतर विवाहितेला मोहम्मद हारूल याने गुंगीचे औषध दिले. औषधामुळे बेशुद्ध झालेल्या विवाहितेवर पाचही जणांनी अत्याचार केला. दुसऱ्या दिवशी पीडित महिलेला तिच्या नातेवाइकांनी सर्वोपचार रुग्णालयात दाखल केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. पीडितेची प्रकृती सुधारल्यानंतर तिने १ जानेवारी चान्नी पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली.पीडितेच्या तक्रारीवरून चान्नी पोलिसांनी पाच जणांविरुद्ध भादंवीच्या कलम ३७६ डी,३६३,३२४,३४, कलमान्वये तसेच अॅट्रॉसिटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. कलमान्वये रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे. यातील मुख्य आरोपी मोहम्मद हारुल शे. अकबर यास अटक केली आहे.त्याला अकोला जिल्हा व सत्र न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला ६ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.पुढील तपास बाळापूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी रोहिणी सोळंके करीत आहे. (वार्ताहर)
गुंगीचे औषध देऊन विवाहितेवर सामूहिक अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2020 12:11 PM