लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : वाशिम जिल्हय़ातील कुप्रसिद्ध असलेल्या दरोडेखोरांच्या मोठय़ा टोळीला जेरबंद करण्यात पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाला यश आले. दरोडेखोरांची ही टोळी सोने तस्करीच्या बेतात असल्याची माहिती मिळताच विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांनी पथकासह छापा टाकून या पाच दरोडेखोरांना शनिवारी मध्यरात्री खडकी परिसरातून अटक केली.वाशिम जिल्हय़ातील काटा येथील रहिवासी दीपक रजन बनसोड (२७), भटमुरा येथील रहिवासी संतोष विठ्ठल काळे (२२), रिसोड येथील दगडू शिवराम गायकवाड (५३), रिसोड तालुक्यातील देगाव येथील रहिवासी शिवाजी गणपत भुटेकर (३२) आणि वाशिम शहरातील विठ्ठल गणपत दळवी (२५) या पाचही गुन्हेगारांवर वाशिम जिल्हय़ातील बहुतांश पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून, अकोल्यातही त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. या पाच दरोडेखोरांची टोळी शनिवारी मध्यरात्री खडकी परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांना मिळाली. त्यांनी पथकासह सापळा रचून रात्रभर त्यांच्यावर पाळत ठेवली. ही टोळी दरोडा टाकण्याच्या तसेच सोने तस्करीमध्ये एका व्यापार्याला लुटण्याच्या बेतात असल्याचे दिसताच अळसपुरे व पथकाने या टोळीतील पाचही दरोडेखोरांना रंगेहात अटक केली. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक हर्षराज अळसपुरे व पथकाने केली.
या दरोडेखोरांच्या टोळीकडून नेपाळमध्ये चलनात असलेल्या नोटा जप्त करण्यात आलेल्या आहेत. सुरुवातीला विशेष पथकप्रमुख हर्षराज अळसपुरे यांनी विचारणा केली असता, या टोळीने या नोटांची माहिती देण्यास टाळाटाळ केली. मात्र, त्यानंतर या नोटांची माहिती घेतली असता, या नोटा नेपाळमध्ये चलनात असल्याची बाब समोर आली. यावरून या टोळीचे कनेक्शन मोठय़ा स्तरावर असल्याचे दिसून येत आहे.
अशी आहे मोडस ऑपरेंडीदरोडेखोरांची ही टोळी दोन किलो सोने असल्याची बतावणी करून एखाद्या व्यापार्याला ते स्वस्तात देण्याचे आमिष दाखवितात. त्यांच्या आमिषाला बळी पडलेल्या व्यापार्याला काही प्रमाणात खरे सोने दाखविण्यात येते. त्यानंतर पूर्ण रक्कम घेऊन दोन किलो सोने देण्याचा व्यवहार करण्यासाठी शहराच्या बाहेरील ठिकाण निवडण्यात येते. या ठिकाणी पोहोचताच व्यापार्याकडील रक्कम घेऊन त्यांना पिवळया धातूचे दुसरेच दागिने देण्यात येतात. अशा प्रकारच्या लुटमार व दरोडे या टोळीने आतापर्यंत बरेच वेळा टाकल्याचे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे.
नगराध्यक्ष बेनीवाले खुनातील आरोपीयामध्ये हर्षराज अळसपुरे यांनी अटक केलेला विठ्ठल दळवी हा आरोपी वाशिम येथील तत्कालीन नगरसेवक गंगू बेनीवाले यांच्या खून प्रकरणात मुख्य आरोपी असल्याची माहिती आहे. त्याच्यावर शस्त्र बाळगणे, दरोडा टाकणे, प्राणघातक हल्ला, लुटमार करणे यासह विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
चार सूत्रधारांसह नवखा गजाआडदरोडेखोरांच्या या टोळीमध्ये अटक करण्यात आलेले चार सूत्रधार असून, एक नवखा दरोडेखोर असल्याची माहिती आहे. या दरोडेखोरांवर खून, दरोडा, अवैधरीत्या हत्या बाळगणे, बनावट नोटा, चोरी यासह अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. या टोळीने वाशिमसह अकोला जिल्हय़ात प्रचंड धुडगूस घातला असून, विशेष पथकाने या टोळीच्या मुसक्या आवळल्याने अनेक व्यापार्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.