दर्यापूर व नागपुरातील दोन आरोपी अटकेत
अकोला : लहान उमरी परिसरातील रहिवासी असलेल्या एका युवकास बँकेत नोकरी लावण्याचे बनावट नियुक्तपत्र देणाऱ्या टोळीला रामदासपेठ पोलिसांनी अटक केली. या दोघांचीही २६ एप्रिल रोजी पोलीस कोठडी संपल्याने त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दोन्ही आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.
लहान उमरी येथील रहिवासी अनुप ज्ञानेश्वर पिंजरकर या युवकासह अनेक युवकांना दर्यापूर येथील रहिवासी डॉ. श्रीकांत मंगेश बानुवाकुडे (३२) आणि मानेवाडा रोड नागपूर येथील रहिवासी देवानंद रमेश अनासने या दोघांनी वन विभाग तसेच बँकेमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष देऊन त्यांच्याकडून लाखो रुपयांची रक्कम उकळली. अनुप पिंजरकर यांच्याकडून सुमारे ९ लाख ६० हजार रुपयांची रक्कम बँकेत नोकरी लावून देण्याचे आमिष देऊन उकळली. त्यानंतर नोकरी लागत नसल्याने युवकाने तगादा लावला असता या दोन्ही आरोपींनी अनुप पिंजरकर यांना बँकेत नोकरी लावल्याचे बनावट नियुक्तीपत्र दिले. युवक हे नियुक्तीपत्र घेऊन बँकेत नोकरीसाठी गेला असता फसवणूक झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्याने या प्रकरणाची तक्रार रामदासपेठ पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी दोन आरोपींविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ४२०, ४६७, ४६८, ४७१, ३४ नुसार गुन्हा दाखल केला. त्यानंतर डॉ. श्रीकांत बानुवाकोडे याला दर्यापूर येथून तर देवानंद अनासने याला नागपूर येथून अटक केली. दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना २६ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. पोलीस कोठडी संपल्याने आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांची कारागृहात रवानगी केली. या प्रकरणात आणखी काही आरोपी वाढण्याची शक्यता असून रामदास पेठ पोलीस ठाण्याचे ठाणेदार गजानन गुल्हाने यांनी तपास सुरू केला आहे.