पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांचा आदेश
अकोला : जिल्हाभरात टोळीने गुन्हे करणाऱ्या दोन जणांच्या टोळीला पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या आदेशाने गुरुवारी जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. रिपाइं आठवले गटाचे महानगराध्यक्ष गजानन कांबळे व युवराज भागवत या दोघांचा आरोपींमध्ये समावेश आहे. आतापर्यंत पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने जिल्ह्यातील सुमारे ३१ टोळ्यांना हद्दपार करण्यात आले आहे.
जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पंचशीलनगर वाशीम बायपास येथील रहिवासी तथा रिपाइं नेता गजानन काशिनाथ कांबळे व युवराज साहेबराव भागवत हे दोघेजण जिल्ह्याच्या विविध भागांत टोळीने गुन्हे करत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांना मिळाली. या माहितीवरून दोन्ही गुन्हेगारांवरील गुन्हेगारीची मालिका पाहता पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी या दोघांविरुद्ध हद्दपारीचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले. यावरून जुने शहर पोलिसांनी या दोन गुन्हेगारांविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती पोलिसांकडे सादर केली. जुने शहर पोलीस ठाण्यासह जिल्ह्याच्या विविध भागात या दोघांनीही टोळीने अनेक गुन्हे केल्याचे समोर आले. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक तसेच त्यांना सुधारण्यासाठी वारंवार कारवाई करण्यात आली; मात्र दोनही गुन्हेगार पोलिसांच्या या कारवाईला जुमानत नसल्याने पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या आदेशाने या दोन्ही गुन्हेगारांना जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी हा आदेश गुरुवारी दिला असून टोळीला जिल्ह्याच्या बाहेर काढण्यात आले आहे. यासाठी स्थानिक गुन्हे शाखाप्रमुख शैलेश सपकाळ व जुने शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार महेंद्र देशमुख यांनी आवश्यक ती प्रक्रिया केली.