अकोला: वाशिम मार्गावर पातूर जवळ असलेल्या नॅशनल ढाब्यावर ट्रकमधून पेट्रोल-डिझेलची चोरी करून काळ्या बाजारात त्याची विक्री करणाऱ्या पाच जणांच्या टोळीच्या पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाने सोमवारी मुसक्या आवळल्या. पोलिसांनी पाच जणांना अटक करून त्यांच्याकडून १२0 लिटर डिझेलसह एकूण ३५ लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाला वाशिम मार्गावर पातूर शहरानजिकच्या नॅशनल ढाब्यावर थांबलेल्या पेट्रोल-डिझेल टँकरमधून पेट्रोल-डिझेलची चोरी करून त्याची काळ्या बाजारात काही जण विक्री करीत असल्याची माहिती मिळाली. विशेष म्हणजे, हा प्रकार अनेक वर्षांपासून सुरू होता. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी नॅशनल ढाब्यावर सापळा रचला आणि ढाब्यावरील चोरट्यांच्या हालचालींवर पाळत ठेवली. सोमवारी दुपारच्या सुमारास एमएच ३0 बीडी 0७२७ क्रमांकाच्या टँकरमधून काहीजण डिझेल काढत असल्याचे विशेष पोलीस पथकाला दिसून आले आहे. या टँकरमध्ये 20 हजार लिटर डिझेल होते. पोलिसांनी अचानक छापा घातला आणि टँकरमधून डिझेल चोरताना, फैय्याज बेग रज्जाक बेग(३२ रा. चाँदखॉ प्लॉट, कब्रस्थान अकोला), अब्दुल जावेद अब्दुल रशिद(३२ रा. मुजावरपुरा पातूर), अकबर खान अख्तर खान(पूरपिडीत कॉलनी, अकोट फैल), विजय सदानंद मौर्य(४0 रा. शंकर नगर अकोट फैल), नाजिमोद्दीन अनिसोद्दीन(२0 रा. जिराबावडी खदान) यांना रंगेहात अटक करण्यात आली. पेट्रोल-डिझेल टँकरमधून तेलाची चोरी करण्याचा गोरखधंदा अनेक वर्षांपासून सुरू होता. परंतु हफ्तेखोरी व आर्थिक हितसंबधांमुळे पातूर पोलिसांनी याकडे जाणीवपुर्वक र्दुलक्ष केल्याचे सोमवारी विशेष पथकाने केलेल्या कारवाईतून दिसून येते. या प्रकरणात पोलिसांनी पातूर पोलीस ठाण्यात जीवनाश्यक वस्तू अधिनियम कलम ३, ७ नुसार गुन्हा दाखल केला. ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांच्या मार्गदर्शनात विशेष पथकाचे प्रमुख मिलिंद बहाकर यांनी केली.
पेट्रोल-डिझेलची चोरी करणारी पाच जणांची टोळी गजाआड!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 6:31 PM