कोरोना काळात बहुतांश लोक घरातच होते. त्यामुळे समाजासोबतचा संवाद तुटला. मुलांची शाळा ऑनलाइन झाली, तर नोकरदारांचेही वर्क फ्रॉम होम सुरू झाले. त्यामुळे गृहिणींच्या कामाचे गणितही चुकू लागल्याने चिडचिड वाढू लागली. त्यामुळे अनेक कुटुंबात गृहकलह देखील वाढल्याचे दिसून आले. याचा परिणाम मानसिक आरोग्यावर झाल्याने अनेकांना मानसोपचार तज्ज्ञांचा सल्लाही घ्यावा लागला, मात्र हे सर्व असताना तुम्ही जर जवळच्या व्यक्तीजवळ मन हलके केले, त्याच्याशी बोलून तणावाचा निचरा केल्यास मानसिक आरोग्य टिकून राहू शकते.
मन हलके करणे हाच उपाय
मानसिक स्वास्थ्य राखणे ही आपली स्वत:ची जबाबदारी आहे. कुठल्याही गोष्टीचा किंवा घटनेचा अति विचार करणे, भीती बाळगणे, शांत बसावेसे वाटणे ही लक्षणे मानसिक आजाराची आहेत.
आपल्यातही अशी लक्षणे दिसत असतील, तर कुटुंबातील किंवा जवळच्या मित्रांसोबत गप्पा मारा. ज्या गोष्टीमुळे ताणतणाव वाढत आहे, त्या गोष्टी मित्राकडे बोलून मन हलके करा.
मानसिक ताण कमी करण्याचा हा चांगला उपाय असल्याचे तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे तणावमुक्त राहण्यासाठी संवाद साधा, आवडीच्या गोष्टी करा आणि कामाचे नियोजन करा.
मानसोपचार तज्ज्ञ म्हणतात.....
बदलती जीवनशैली आणि वाढलेला स्क्रीन टाइम यामुळे अनेकांमधील संवाद कमी झाला आहे. दुसरीकडे वाढता ताणतणाव यामुळे मानसिक आरोग्यही ढासळत आहे. यापासून बचावासाठी कुटुंबातील सदस्यांसोबत किंवा जवळच्या मित्रांसोबत संवाद साधणे गरजेचे आहे.
- डॉ. शिल्पा तेलगोटे, मानसोपचार तज्ज्ञ, जीएमसी, अकोला