लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: शहरासह जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या मुंगीलाल बाजोरिया प्रांगणावरील गरबा महोत्सव आटोपल्यानंतर शनिवारी मध्यरात्री तुफान हाणामारी झाली. रविवारी पहाटे सिटी कोतवाली पोलिसांनी या हाणामारी प्रकरणातील ११ आरोपींविरुद्ध दंगलीचे गुन्हे दाखल केले आहेत. हाणामारीत गंभीर जखमी शिवम ठाकूर या युवकावर सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत.सिटी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुंगीलाल बाजोरिया प्रांगणावर जिल्ह्यातील सर्वात मोठा तसेच प्रतिष्ठितांसाठी गरबा रास आयोजित करण्यात येतो. दरम्यान, शनिवारी मध्यरात्री गरबा रास आटोपल्यानंतर काही युवकांमध्ये युवतींशी बोलण्यावरून वाद झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. दोन गटातील युवकांमध्ये वाद सुरू झाल्याचे लक्षात येताच या ठिकाणावरून युवतींनी काढता पाय घेतला; मात्र त्यानंतर दोन्ही गटातील युवकांमध्ये तुफान हाणामारी झाली. यामध्ये काही युवकांनी धारदार शस्त्रांनी हल्ला केल्याने एक युवक गंभीर जखमी झाला.या घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, शहर पोलीस उप अधीक्षक सचिन कदम, स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख शैलेश सपकाळ व सिटी कोतवाली पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. त्यांनी तातडीने दोन्ही गटातील युवकांची धरपकड सुरू करून राजेश सुखदेव रिंगणे यांच्या तक्रारीवरून सिटी कोतवाली पोलिसांनी शिवम वीरेंद्रसिंह ठाकूर, तिलक उदयसिंह ठाकूर, अनुप सोनाजी वानखडे, श्रेयश अशोक पांडे, अजय ठाकूर, यश मोहता, सूरज ठाकूर, नीलेश ठाकूर, सुमीत पांडे, प्रतीक पांडे, क्ष्वेतक पांडे यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम १४३, १४७, १४९, १६० नुसार गुन्हा दाखल केला आहे.
गरबा महोत्सवात हाणामारी; दोन्ही गटातील ११ आरोपींविरुद्ध दंगलीचे गुन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2019 12:07 PM