अकोल्यातील घटना : संसारोपयोगी वस्तूची राख !खेट्री (जि. अकोला) : येथून जवळच असलेल्या सावरगाव येथे घरगुती सिलिंडरचा स्फोट होऊन घरातील संसारोपयोगी वस्तू भस्मसात झाल्या. आग विझवताना सात जण जखमी झाले असून यामुळे गजानन जठाडे यांचा संसार उघड्यावर पडला आहे. ही घटना बुधवारी घडली. आगीचा भडका उडताच शेजाऱ्यांनी आग विझविण्यासाठी धावपळ केली. आग विझवताना सचिन बबन मुळे (१८), राजू डिगांबर शिंदे (२८), बबन जानकीराम डाखोरे (५०) देवानंद दशरथ करवते (१७), गणेश सुखदेव डाखोरे (३०), आत्माराम पंढरीलाल (२५) व गौतम मुकिंदा वानखडे असे एकूण सात जण जखमी झाले. त्यांच्यावर मळसूर प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करण्यात आले. यापैकी पाच जणांना अकोल्यात हलविण्यात आले आहे. सदर घटनेची माहिती मिळताच चान्नी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. आगीमध्ये घरातील तूर, सोयाबीन, दाळ, अन्य धान्य, पत्रे व इतर साहित्य जळून खाक झाले.