अकोला : जिल्ह्यात घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल २५ रुपयांनी वाढ झाली आहे. आता हे सिलिंडर ८८० रुपयांना मिळत आहेत. त्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले असून वाढत्या महागाईने सर्वसामान्य चांगलेच हैराण झाले आहेत. त्यामुळे हा महागाईचा आलेख आणखी किती वाढणार असाही प्रश्न नागरिकांना पडला आहे.
आधीच डिझेल, पेट्रोलच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या नाकीनऊ आल्या असताना घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरात कमालीची वाढ झाली आहे. महिनाभराआधी गॅस सिलिंडर २५ रुपये ५० पैशांनी महागले होते. आता पुन्हा सिलिंडरच्या दरात वाढ झाली आहे. हे सिलिंडर ८८० रुपयांना मिळत आहे. त्यामुळे एकीकडे जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढत असताना घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरात होणारी वाढ सर्वसामान्यांना आर्थिक ताण देणारी ठरत आहे. सिलिंडरचे दर कमी करण्याची मागणी गृहिणींकडून करण्यात येत आहे.
सबसिडी बंद, दरवाढ सुरूच!
गॅस सिलिंडरवर सुरुवातीपासून सबसिडी मिळत होती. यामुळे गोरगरिबांना सिलिंडर विकत घेणे परवडत होते.
परंतु मे २०२० पासून सिलिंडरवर सबसिडी मिळणे बंद झाले आहे. काहीच जणांना ३-४ रुपये सबसिडी मिळते.
मात्र, कोरोना काळापासून सबसिडी बंद असली तरी सिलिंडरच्या दरात दर महिन्याला वाढ सुरूच आहे.
शहरात चुली कशा पेटवायच्या?
गॅसचे भाव वाढत असल्याने सिलिंडरसाठीची रक्कम आणायची कुठून, असा आम्हां गरिबांपुढचा प्रश्न आहे. तसेच शहरात चुल पेटवायची असल्यास जळतन विकत घ्यावे लागते. ते जळतनही महाग आहे. शहरात चूल पेटविणे कठिणच झाले आहे.
- दिव्या गवई, गृहिणी
कोरोनामुळे अगोदरच रोजगार मिळेनासा झाला आहे. त्यामुळे रोजचा दिवस कसा काढावा, असा प्रश्न पडला असताना सातत्याने गॅस सिलिंडरच्या दरात वाढ होत आहे. लाकडाच्या जळतनाचे दरही अव्वाच्या सव्वा आहे. त्यामुळे शहरात चूल पेटवायची तरी कशी, असा प्रश्न आहे.
- निशिगंधा पाटील, गृहिणी
आठ महिन्यांत १४० रुपयांची वाढ
महिना दर (रुपयांत)
जानेवारी ७४०
फेब्रुवारी ७६४
मार्च ७६४
एप्रिल ७८९
मे ८२०
जून ८२६
जुलै ८५५
ऑगस्ट ८८०
छोट्या सिलिंडरच्या दरातही फरक
घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.
त्यामुळे ग्रामीण भागातील महिला आता सर्रास चुलीकडे वळताना दिसत आहेत.
सोबतच ५ किलो सिलिंडच्या दरातही काही प्रमाणात फरक पडला असून घरगुती सिलिंडर ३३५ रुपयांना मिळते.
तर व्यावसायिक सिलिंडर ५१३ रुपयांना मिळत आहे. याचा मोठा परिणाम जाणवत आहे.
व्यावसायिक सिलिंडर सहा रुपयांनी महाग
दरवाढीचा परिणाम घरगुती सिलिंडर सोबत व्यावसायिक सिलिंडरवरही झाला आहे.
आधी १६८२ रुपये ५० पैशांना मिळणारे सिलिंडर आता १६८८ रुपये ५० पैशांना मिळत आहे.