संतोष येलकरअकोला, दि. ४- सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत जिल्ह्यातील ३ लाख ५४ हजार ७२५ शिधापत्रिकाधारकांपैकी गॅस सिलिंडर असलेल्या शिधापत्रिकाधारकांची माहिती नोंदविण्याचे काम सुरू आहे. डिसेंबर अखेरपर्यंत गॅस सिलिंडरधारक १ लाख ५७ हजार २१३ शिधापत्रिकाधारकांचे रॉकेल वितरण पुरवठा विभागामार्फत बंद करण्यात आले आहे.सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत गॅस सिलिंडरधारक शिधापत्रिकाधारकांना रॉकेलचे वितरण बंद करण्याचा निर्णय शासनामार्फत घेण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील गॅस सिलिंडरधारक शिधापत्रिकाधारकांचे रॉकेल वितरण बंद करण्याची कारवाई जिल्हा पुरवठा विभागामार्फत सुरू करण्यात आली आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत जिल्ह्यात ३ लाख ५४ हजार ७२५ शिधापत्रिकाधारक आहेत. एकूण शिधापत्रिकाधारकांपैकी गॅस सिलिंडर असलेल्या शिधापत्रिकाधारकांची माहिती नोंदविण्याचे (गॅस स्टॅम्पिंग) काम जिल्ह्या तील सातही तालुक्यात वर्षभरापासून जिल्हा पुरवठा विभागामार्फत सुरू करण्यात आले आहे. त्यामध्ये डिसेंबर अखेरपर्यंत जिल्ह्यातील १ लाख ५७ हजार २१३ गॅस सिलिंडरधारक शिधापत्रिकाधारकांचे रॉकेल वितरण जिल्हा पुरवठा विभागामार्फत बंद करण्यात आले आहे, त्यामुळे संबंधित शिधापत्रिकाधारकांना दरमहा रास्त भाव दुकानांतून मिळणारे रॉकेल बंद झाले आहे. जिल्ह्यातील उर्वरित १ लाख ३0 हजार ७२९ शिधापत्रिकाधारकांची माहिती नोंदविण्याचे काम जिल्ह्यात पुरवठा विभागामार्फत सुरू असून, त्यामध्ये गॅस सिलिंडर असलेल्या शिधापत्रिकाधारकांचे रॉकेल वितरण लवकरच बंद करण्यात येणार आहे.रॉकेलची मागणी झाली कमी !जिल्ह्यातील गॅस सिलिंडरधारक शिधापत्रिकाधारकांचे केरोसीन वितरण बंद करण्यात आल्याने, शिधापत्रिकाधारकांना रॉकेल वितरीत करण्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयामार्फत शासनाकडे करण्यात येणारी रॉकेलची मागणी कमी झाली आहे. जिल्ह्यातील ३ लाख ५४ हजार ७२५ शिधापत्रिकाधारकांना रॉकेल वितरण करण्यासाठी गत मार्चमध्ये १ हजार १७ किलोलिटर रॉकेलची मागणी पुरवठा विभागामार्फत करण्यात येत होती. गॅस सिलिंडरधारक शिधापत्रिकाधारकांचे रॉकेल वितरण बंद करण्यात आल्याने, जिल्ह्यातील रॉकेलची मागणी ३0५ किलोलिटर कमी झाली आहे.
गॅस सिलिंडरधारकांचे रॉकेल वितरण बंद !
By admin | Published: January 05, 2017 2:48 AM