अकोला : एलबीटी कमी करण्यात यावा, व्हॅट कमी करण्यात यावा, तसेच ज्याप्रमाणे सोन्यावर एलबीटी लावण्यात आली आहे, त्या प्रमाणात पेट्रोल आणि डिझेलवर एलबीटी लावण्यात यावा, या मागणीसाठी सोमवारी पेट्रोल- डिझेल असोसिएशनने पुकारलेला बंद पूर्णपणे यशस्वी झाला. पेट्रोल व डिझेल न मिळाल्यामुळे काही वाहनधारकांची तारांबळ उडाली. पेट्रोल व डिझेलवर राज्यात लावण्यात येत असलेला एलबीटी, व्हॅट काही प्रमाणात कमी करण्यात यावा किंवा प्रती लीटरमागे ३0 पैसे याप्रमाणे एलबीटी व व्हॅट लावण्यात यावा, या मागणीसाठी सोमवारी राज्यातील पेट्रोल पंप संचालकांनी बंद पुकारला होता. या बंदमध्ये अकोला जिल्हय़ातील पेट्रोल पंपांचाही सहभाग असून, जिल्हय़ात हा बंद शांततेत पार पडला. पेट्रोल व डिझेलवर केवळ महाराष्ट्रात लावण्यात येत असलेला स्टेट स्पेसेफिक चार्ज (एसएससी) हा संपूर्ण देशातील वाहनधारकांजवळून घेण्यात यावा, अशी मागणी या बंदद्वारे करण्यात आली आहे. व्हॅट आणि एलबीटी कमी करून ३0 पैसे प्रती लीटरमागे हा कर लावल्यास राज्यात पेट्रोल व डिझेल ४ ते ७ रुपयांनी स्वस्त होणार असल्याने हा बंद पुकारण्यात आला होता. एसएससी हा चार्ज केवळ राज्यातील जनतेच्या खिशातून वसूल करण्यात येत असून, हा चार्ज संपूर्ण देशातील जनतेजवळून वसूल करण्याची मागणी या बंदच्या माध्यमातून पेट्रोल व डिलर्स असोसिएशनद्वारे करण्यात आली. अकोला शहरासह जिल्हय़ात पेट्रोल पंप संचालकांचा हा बंद पूर्णपणे यशस्वी झाला.
पेट्रोल-डिझेल पंप बंदने उडाली वाहनधारकांची तारांबळ
By admin | Published: August 12, 2014 12:59 AM