गावरान आंबा म्हटला की, तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही. गावरान आंबा पाडाला आला की, लेकीबाईंना माहेरी जाण्याचे वेध लागतात. आंब्याच्या रसाला लेकीबाईंना बोलावणे येते. परंतु गत काही वर्षांमध्ये गावरान आंब्याची चव दुर्मिळ झाली आहे. एकेकाळी भरपूर प्रमाणात असलेली गावरान आंब्यांची आमराई आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. या आमराईचे संवर्धन करण्याची गरज आहे.
काही वर्षांपूर्वी पातूर व बार्शीटाकळी तालुक्यातील गावरान आंब्याची आमराई विदर्भात प्रसिद्ध होती. परंतु हळूहळू आमराई नष्ट होत गेली. या दाेन्ही तालुक्यांमधील शेतकऱ्यांच्या शेतात किमान चार ते पाच आंब्याचे वृक्ष असायचे. काही ठिकाणी तर शंभर ते सव्वाशे वृक्षांची आमराई असायची. आता हे चित्र बदलले आहे. अनेक शेतकऱ्यांनी शेतातील आंब्यांची झाडे तोडली. आता पिंजर परिसरातही गावरान आंबा मिळणे दुर्मिळ झाला आहे, गावरान आंबा कुठेही दिसला तर, प्रत्येकजण तेथे थांबून तो गावरान आंबा मिळावा म्हणून प्रयत्न करीत असतो. काहीही भाव आंबा असला तरी लोक गावरान आंब्यासाठी उतावीळ होत असत, मात्र गावरान आंबा खेड्यापाड्यात मिळणे कठीण झाले आहे. गावरान आंब्याचा रस तर, सोडाच पण एखादा पाड सुद्धा खाण्यास मिळत नाही. ग्रामीण भागातील शेतकरी गावरान आंबा मिळावा म्हणून प्रयत्न करतो. वादळी पावसाच्या तडाख्यात झाडाचा बहर नष्ट होतो. त्यामुळे शेतकऱ्यासह सामान्यांना आता गावरान आंबा मिळणे दुरापास्त झाले आहे.
फोटो:
शेतातील गावरान आंबा यंदा चांगला बहरला होता. त्यामुळे यंदा आंबा खायला मिळेल. अशी अपेक्षा होती. परंतु झालेल्या वादळी पावसामुळे आंब्याचा बहर गळून गेला. त्यामुळे यंदा ग्रामीण भागात गावरान आंबा मिळणे कठीण आहे.
-ज्ञानेश्वरआटेकर, शेतकरी पातूर नंदापूर