सदानंद सिरसाट । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कधी काळी गावाची तहान भागवणार्या ब्रिटिशकालीन गावतलावाची थेट शेततळे म्हणून नोंद करण्याचा प्रकार खारपाणपट्टय़ात असलेल्या अकोला तालुक्यातील लाखोंडा बुद्रूक गावात घडला आहे. विशेष म्हणजे, मंडळ अधिकार्याने संबंधित शेतकर्याचे प्रतिज्ञापत्र आणि तलाठय़ाच्या सांगण्यावरून ही नोंद प्रमाणित केल्याचे म्हटल्याने या प्रकारातील काळेबेरे उघड होत आहे. याबाबतची तक्रारही पंचायत समिती सदस्य रुपाली सतीश गोपनारायण यांनी जिल्हाधिकार्यांकडे केली आहे.खारपाणपट्टय़ात असल्याने गावाला तलावातून पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, यासाठी ब्रिटिश काळापासून ९0 गुंठे क्षेत्रात गावतलाव तयार करण्यात आला. तेव्हापासून वर्षानुवर्षे ग्रामस्थांनी या तलावातील पाण्याचा वापर केला आहे; मात्र या गावतलावाच्या जमिनीवर गावातील राधाकिसन घावट यांनी अतिक्रमण केले. तलावाची एक बाजू सपाट केली. तलावात वाहून येणार्या पाण्याचा मार्ग बंद केला. त्या जमिनीचा वापर कसण्यासाठी सुरू केला. त्यावर कळस म्हणजे, २0११ मध्ये सपाटीकरण केलेल्या जमिनीच्या भागाची शेततळे म्हणून नोंदही करून घेतली. तत्कालीन तलाठी व मंडळ अधिकार्यांनी १५ जून २0११ रोजी ही नोंद प्रमाणित केली. या प्रकारात मोठा आर्थिक व्यवहार झाल्याची माहिती रुपाली गोपनारायण यांनी तक्रारीत दिली आहे.
तलाठय़ाच्या तोंडी सांगण्यावरून झाली नोंदघावट यांनी अध्र्या एकराच्या क्षेत्रात केलेले शेततळे कोणत्या यंत्रणेने करून दिले, त्याचा मंजुरी आदेश, काम पूर्णत्वाचे पत्र यापैकी कोणताही कागद तलाठी, मंडळ अधिकार्यांना दिला नाही. केवळ स्वयंप्रतिज्ञापत्राद्वारे नोंदीची मागणी केली. त्यावर मंडळ अधिकार्यांनी तलाठय़ाने शेततळे असल्याचे तोंडी सांगितल्यावरून नोंद प्रमाणित केल्याचे म्हटले. हा प्रकार शेततळ्य़ाची सत्यता उघड करणारा आहे.
वर्ग २ च्या जमिनीचे लाभार्थीलाखोंडा बुद्रूक गावातील गट क्रमांक १३५ मधील जमिनीचे १९८८ मध्ये १३ लाभार्थीना वाटप करण्यात आले. त्यावेळी राधाकिसन घावट यांना १.९५ हेक्टर जमीन मिळाली. त्या जमिनीत तब्बल १५ गुंठय़ापेक्षाही अधिक क्षेत्राचे (४0 बाय ४0 मीटर) शेततळे असल्याची नोंद करून घेण्यात आली.
गावात भीषण पाणीटंचाईसद्यस्थितीत गावात पाण्याची भीषण टंचाई आहे. ग्रामस्थ व जनावरांना या तलावातील पाण्याचा आधार होता. त्यावर अतिक्रमण केल्याने तोही हिरावण्यात आला. अवैध अतिक्रमण तातडीने हटवण्यात यावे, सोबतच शासकीय जागेतील तलावाची खासगी शेततळे म्हणून नोंद करणार्या मंडळ अधिकारी, तलाठय़ावर फौजदारी कारवाई करा, अशी मागणी रुपाली गोपनारायण यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.
शेततळ्य़ाची नोंद घेण्यासाठी संबंधित यंत्रणेचे कामाबाबतचे कोणतेही प्रमाणपत्र आवश्यक आहे. घावट यांची नोंद जुनी आहे, त्यावेळी नोंद कशाच्या आधारे झाली, हे सांगता येत नाही. त्यांच्या शेतात शेततळ्य़ाची नोंद आहे. - पुरुषोत्तम गायवाडे, तलाठी, लाखोंडा बुद्रूक.