राज्य शासनाने १३ जुलै राेजी सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश जारी केला हाेता. यामध्ये फेब्रुवारी २०२१ मध्ये मनपाच्या आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारणाऱ्या निमा अराेरा यांची अकाेला जिल्हाधिकारी या पदावर तसेच जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांची अकाेला मनपाच्या आयुक्तपदी नियुक्तीचा समावेश हाेता. यादरम्यान, पापळकर यांनी आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारलीच नाहीत. त्यामुळे आयुक्तपदाचा अतिरिक्त प्रभार जिल्हाधिकारी निमा अराेरा यांच्याकडे हाेता. ३० जुलै राेजी शासनाने १४ सनदी अधिकाऱ्यांचा बदली आदेश जारी केला. यामध्ये कल्याण येथे महावितरणच्या सहव्यवस्थापकीय संचालक पदावर कार्यरत आयएएस गाेविंद बाेडके यांची मनपाच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. पंधरा दिवस उलटून गेल्यावरही अद्यापपर्यंत बाेडके मनपात दाखल न झाल्यामुळे त्यांच्या नियुक्तीची शक्यता मावळली असल्याचे बाेलल्या जात आहे.
आता काेणाची नियुक्ती?
वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांची पदे आजपासून नव्हे तर मागील अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. अशा स्थितीत स्थानिक अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या साथीनेच मनपाचा कारभार यशस्वीरित्या हाकल्या जात आहे. असे असतानाही काही संधीसाधू राजकारण्यांकडून शासन दरबारी मनपाची नाहक बदनामी केली जाते. परिणामी वरिष्ठ अधिकारी नियुक्त हाेण्यास धजावत नाहीत. बाेडके यांची भूमिका लक्षात घेता आता शासन काेणाची नियुक्ती करते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.