लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत कारभाराच्या विविध मुद्यांवर जिल्हा परिषद शिक्षण समितीची सभा शुक्रवारी चांगलीच गाजली.गत १६ नोव्हेंबर २०१६ रोजी शिक्षण समितीच्या सभेत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार, शिक्षकांच्या सर्व आंतरजिल्हा बदलीचे ना-हरकत प्रमाणपत्र रद्द करण्याचा ठराव झालेला असताना आंतरजिल्हा बदलीच्या नस्ती का सादर करण्यात आल्या, अशी विचारणा सभेत करण्यात आली. तसेच शाळा आवारभिंत व शाळा दुरुस्ती कामांच्या नस्ती जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेसमोर का ठेवण्यात आल्या नाही, विद्यार्थ्यांना बूट, मोजे, टाय व बेल्ट वाटपाच्या योजनेची नस्ती जिल्हा परिषदेच्या गत १४ जून रोजीच्या सर्वसाधारण सभेत का ठेवण्यात आली नाही, अशी विचारणा करीत विविध मुद्यांवर या सभेत चर्चा करण्यात आली. जिल्हा परिषद शिक्षण सभापती पुंडलिकराव अरबट यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सभेला समितीचे सदस्य मनोहर हरणे, ज्योत्स्ना चोरे, प्रतिभा अवचार, शबाना खातून सैफुल्ला, अक्षय लहाने, संतोष वाकोडे, विजया आखरे यांच्यासह प्रभारी प्राथमिक शिक्षणाधिकारी देवेंद्र अवचार व संबंधित अधिकारी उपस्थित होते. सकाळी ११ वाजता शिक्षण समितीची सभा आयोजित करण्यात आली होती; मात्र सभेचे सचिव तथा प्राथमिक शिक्षणाधिकारी अवचार यांच्या उपस्थितीअभावी ही सभा दुपारी ४ वाजता सुरू करण्यात आली. शिक्षणाधिकाऱ्यांना धरले धारेवर!शिक्षण समितीची मागील सभा तीन सदस्यांच्या उपस्थितीत कोरम नसताना सुरू करण्यात आली व नंतर तहकूब करण्यात आली; परंतु तीनच सदस्य उपस्थित असताना सभा सुरू का करण्यात आली, अशी विचारणा करीत या मुद्यावर प्राथमिक शिक्षणाधिकारी देवेंद्र अवचार यांना या सभेत चांगलेच धारेवर धरण्यात आले.
शिक्षण विभागाच्या कारभारावर गाजली सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2017 1:15 AM