लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : येथील जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा गुरुवार, ४ मार्च रोजी दुपारी १ वाजता ‘व्हिडीओ कॉन्फरसिंग’द्वारे घेण्यात येणार आहे. या सभेमध्ये विविध ३२ विषयांवर चर्चा होणार आहे.
गतवर्षी १० डिसेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत वेळेवरच्या विषयात मंजूर करण्यात आलेल्या विविध १८ ठरावांची अंमलबजावणी करण्यास मनाई करत संबंधित विषय आगामी सर्वसाधारण सभेच्या विषयपत्रिकेवर घेण्याचा आदेश विभागीय आयुक्तांनी दिला होता. त्या अनुषंगाने ४ मार्च रोजी होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या ‘ऑनलाईन’ सर्वसाधारण सभेच्या विषयपत्रिकेवर १८ ठरावांच्या विषयांसह जिल्हा वार्षिक योजनांतर्गत रस्ते कामांना प्रशासकीय मान्यता, जनसुविधा अंतर्गत कामांना प्रशासकीय मान्यता, पंधराव्या वित्त आयोगांतर्गत निधीतील कामांना मान्यता आदी ३२ विषय घेण्यात आले आहेत. विषयपत्रिकेवरील या ३२ विषयांवर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत चर्चा होणार आहे. त्यामध्ये काही विषयांच्या मुद्द्यांवर जिल्हा परिषदेची ऑनलाईन सभा वादळी ठरण्याची शक्यता आहे.