- प्रवीण खेतेअकोला : यंदाच्या खरीप हंगामात पेरलेल्या सोयाबीनचे बियाणे उगवलेच नसल्याच्या अनेक तक्रारी राज्यभरातून आल्या आहेत; मात्र अशातच केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या एका पत्राद्वारे सोयाबीनच्या बियाण्यांची उगवण क्षमता ६५ टक्क्यांवरून थेट ६० टक्क्यांवर आणली आहे.राज्यातील प्रमुख पिकांपैकी एक असलेल्या सोयाबीनची यंदा अनेक भागात लागवड करण्यात आली; परंतु अनेक भागात पेरलेले सोयाबीनचे बियाणे उगवलेच नसल्याच्या तक्रारी राज्यभरातून येऊ लागल्या. अशातच १९ जून रोजी केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाकडून एका पत्राद्वारे बियाणे उत्पादन कंपन्यांना दिलासा देण्यात आला. त्यानुसार, यंदाच्या खरीप हंगामाची उगवण क्षमता ही ६५ टक्क्यांवरून ६० टक्क्यांवर आणण्यात आली. बियाण्यांच्या उगवण क्षमतेचे प्रमाण कमी करण्याची गत तीन महिन्यातील ही दुसरी वेळ होती. यापूर्वी १५ एप्रिल रोजी केंद्र सरकारने उगवण क्षमता ६५ टक्क्यांवर आणली होती. ती यापूर्वी ७० टक्क्यांवर होती. त्यामुळे आता शेतकऱ्यांना सोयाबीन लागवडीसाठी एकरी सरासरी ३० ऐवजी ३५ किलो बियाण्यांची बॅग खरेदी करावी लागत आहे.गतवर्षीच्या पावसाने झाले नुकसानगतवर्षी राज्यात झालेल्या दमदार पावसामुळे अनेक भागात पूर परिस्थिती होती. परिणामी बीज उत्पादनासाठी साठवून ठेवलेले बियाणे पावसात भिजल्याने मोठे नुकसान झाले. त्याचा परिणाम बियाण्यांच्या उगवण क्षमतेवरदेखील झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.केद्रीय कृषी मंत्रालयाच्या सूचनेनुसार, यंदाच्या खरीप हंगामासाठी सोयाबीनची उगवण क्षमता ६५ वरून ६० टक्क्यांवर आणली आहे. गतवर्षी बियाणे पावसात भिजल्याने बीज उत्पादनावर परिणाम झाला.- प्रफुल्ल लहाने, गुणवत्ता नियंत्रक, महाबीज, अकोला