अकोला: गतवर्षी झालेल्या पीक नुकसानाची भरपाई म्हणून विमा कंपनीकडून शेतकर्यांना पीक विम्याची रक्कम देण्यात आली; परंतु सदर रक्कम बँक खात्यामध्ये जमा न होता कर्ज खात्यामध्ये वळती होत आहे. त्यामुळे शेतकरी पीकविम्याच्या रकमेपासून वंचित रहात आहेत. पीकविम्याच्या रकमेचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी करणारे निवेदन शेतकर्यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांना सादर केले. गतवर्षीच्या खरीप हंगामात झालेल्या पीक नुकसानापोटी पीक विमा काढलेल्या शेतकर्यांना विमा कंपन्यांकडून विम्याची रक्कम देण्यात आली आहे. ही रक्कम शेतकर्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा होणे अपेक्षित होते; परंतु सदर रक्कम कर्ज खात्यांमध्ये वळती होत आहे. पीक कर्जाचे पुनर्गठन झालेले असताना पीकविम्याच्या रकमेतून व्याजाची वसुली करणे हा शेतकर्यांवर अन्याय आहे. पिकाचा विमा काढण्याची सूचना करूनही गटसचिवांनी विमा काढला नाही. काही शेतकर्यांच्या कर्जामधून विम्याची रक्कमही कपात केली आहे. त्यामुळे शेतकरी पीकविम्याच्या लाभापासून वंचित आहेत. या संपूर्ण प्रकाराची चौकशी करून पात्र लाभार्थींना विम्याचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी शेतकर्यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकार्यांकडे केली. शेतकर्यांची मागणी मान्य न झाल्यास २0 ऑगस्ट रोजी कोणतीही पूर्वसूचना न देता आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही शेतकर्यांनी दिला आहे.
पीकविम्याचा लाभ मिळवून द्या!
By admin | Published: August 15, 2015 1:28 AM