अकोला: कठिण परिश्रमातून साधारण बुध्दीमत्तेच्या व्यक्तीला सुध्दा असाधारण यश प्राप्त होऊ शकते असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी केले. प्रमिलाताई ओक हॉल येथे पालकमंत्री यांनी आयोजीत केलेल्या अकोला शहरातील माध्यमिक शाळा परिक्षेत प्राविण्य प्राप्त गुणवंताच्या व त्यांना घडविणा-या शाळांचा सत्कार व अकरावीच्या केंद्रीय प्रक्रियेसंबंधी एक दिवशीय गुणवंत गौरव व मार्गदर्शन शिबीरात मार्गदर्शन करताना पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय , जिल्हा पोलीस अधिक्षक एम. राकेश कलासागर, शिक्षणाधिकारी (माध्य) प्रकाश मुकुंद, विजुक्टाचे अविनाश बोर्डे, मुख्याध्यापक संघटनेचे जिल्हाध्यक्ष शत्रुघ्न बिरकड, केंद्रीय प्रवेश समितीचे सचिव गजानन चौधरी, उर्द शिक्षण संघटनेचे श्री.साबीर, सेफहॅन्डचे संचालक डॉ. नितीन ओघ, प्रभात किड्स चे संचालक गजानन नारे, पागृत कलासेसचे प्रशांत पागृत, माजी महापौर उज्वलाताई देशमुख, नगरसेवक हरिश अलिमचंदाणी, आशिष पवित्रकार, डॉ. अशोक ओळंबे उपस्थित होते.
सत्काराचे मानकरी असलेल्या विदयार्थ्यांनी परिस्थीतीवर मात करून अथक प्रयत्नाने संघर्ष करीत यश मिळवीले आहे. ही कौतुकास्पद बाब असून यात त्यांच्या गुरूजन व पालकांचे मौलाचे योगदान आहे. असे सांगुन पालकमंत्री डॉ. पाटील पुढे म्हणाले की, केल्याने होते आहे रे , आधिच केले पाहिजे या उक्तीचा भावी जीवनात उपयोग करून यशस्वी व्हा. असा आशिर्वाद त्यांनी विदयार्थ्यांना दिला. पालकमंत्री म्हणाले की, इयत्ता 11 वीच्या प्रवेश पध्दतीत पारदर्शकता येण्यासाठी तसेच विद्यार्थी व पालकांमध्ये कुठलाही संभ्रम निर्माण होऊ नये आणि प्रत्येक महाविद्यालयात जाण्याचा त्रास वाचावा म्हणून प्रवेश प्रक्रीया सहज आणि सुलभ होण्यासाठी 2017-2018 या सत्रापासून इयत्ता 11 वी विज्ञान शाखेचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन पध्दतीने केले जात आहे. या पध्दतीसाठी शिक्षण मंत्री व शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले आहे. यावर्षी सन 2018-19 या शैक्षणिक सत्रासाठी इयत्ता 11 वी विज्ञान शाखेचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन पध्दतीने करण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थी व पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
सध्याचे युग हे स्पर्धेचे युग असून यात यशासोबत अपयशाचा सामना विदयार्थ्यांना करावा लागतो. विदयार्थ्यांनी यशस्वी होण्यासाठी यशासोबत अपयशासाठीही सदैव तयार असावे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी यांनी केले. विदयार्थ्यांनी सर्वगुण संपन्न असावे असे सांगुन त्यांनी विदयार्थ्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्यात. जिल्हा पोलीस अधिक्षक एम राकेश कलासागर यांनीही विदयार्थ्यांचे कौतुक करून त्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्यात.
सर्वप्रथम पालकमंत्री यांनी दिप प्रज्वलन व सरस्वती पुजन करून शिबीराचे उदघाटन केले. यावेळी पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या हस्ते एन.आय.आय.टी. मध्ये 500 च्या वर गुण मिळालेल्या , सीईटी /जेईई मध्ये प्राविण्य मिळविणा-या, व दहावीच्या परिक्षेत प्राविण्य मिळविलेल्या कला , वाणिज्य, विज्ञान शाखेतील गुणवंत विदयार्थ्यांचा सत्कार गुलाब पुष्प , स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन करण्यात आला. तसेच गरीबीवर मात करून व आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या पाल्यांचा विशेष सत्कार यावेळी करण्यात आला. कलाशाखेत बारावीच्या परिक्षेत सई व जुई या जुळया बहिनींना 84.98 टक्के इतके सारखे गुण प्राप्त झाल्यामुळे त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सत्काराचे मानकरी विदयार्थी/विदयार्थींनी, व त्यांचे पालक, विविध शाळेचे प्राचार्य व शिक्षक तसेच मुख्याध्यापक संघ, विजुक्ता संघटना, वि.मा.शिक्षक संघटना , शिक्षक आघाडी, मेष्ठा संघटना, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद , शिक्षक सेना, उर्दु शिक्षक संघटना, खाजगी शिक्षक संघटना, विनाअनुदानित कृती समिती आदि संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभात किड्स चे डॉ. गजानन नारे यांनी केले.
केंद्रीय पध्दतीने केली जाणारी इयत्ता 11 वी विज्ञान शाखेची प्रवेश प्रक्रीयासंबंधी माहिती अकरावी केंद्रीय प्रवेश परिक्षा विभागाचे सचिव गजानन चौधरी यांनी दिली. अकरावी केद्रीय प्रवेश परिक्षाची फॉर्म विक्री आगरकर विदयालय अकोला येथे सुरू आहे. अर्ज भरून 8 केंद्रावर ऑनलाईन भरण्यात येणार आहे. विदयार्थ्यांनी एक आवेदन पत्र भरावे एकदा प्रवेश मिळाल्यानंतर कोणत्याही कारणास्तव प्रवेश रद्द किंवा बदलता येणार नाही. याची नोंद घ्यावी. विदयार्थ्यांनी आपल्या पालकांचे मार्गदर्शन घेवून व मित्र मंडळीही विचार विमर्श करून शांत चित्ताने फॉर्म भरावा.