लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: घरकुल योजनेसाठी प्रत्येक तालुकास्तरावर आढावा घ्या, सिंचन विहिरींचे प्रलंबीत प्रस्ताव तत्काळ मंजूर करा, जनतेच्या अडचणींची तातडीने दखल घेऊन त्या सोडविण्यासाठी अधिकार्यांनी दक्ष राहावे. तालुकास्तरावरील समस्यांचेही तत्काळ निराकरण करा, सार्वजनिक समस्याही वेळेत निकाली काढा, असे निर्देश पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सोमवारी झालेल्या लोकशाही दरबारात दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात पालकमंत्री डॉ. पाटील यांनी लोकशाही दरबारात जिल्हय़ातील नागरिकांची गार्हाणी, तक्रारी ऐकून घेतल्या. यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकरी एस. रामामूर्ती, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र टापरे, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, उपजिल्हाधिकारी अभयसिंह मोहिते, अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम यांच्यासह विभागप्रमुख उपस्थित होते. प्रशासनाकडून समस्या तातडीने सोडविल्या गेल्या पाहिजे, अशी जनतेची अपेक्षा असते, असे सांगत पालकमंत्र्यांनी तक्रार प्राप्त झाल्यानंतर १५ दिवसांत नियमानुसार तक्रारींचे निराकरण करण्याचे बजावले. ग्रामीण किंवा तालुकास्तरावरील अडचणी तेथील संबंधित अधिकार्यांनी सोडवाव्यात. निराकरण झाल्यानंतर तक्रारदाराला कळवावे. महत्त्वाच्या समस्या बैठक घेऊन प्राधान्याने सोडवाव्या. पिकांबाबतच्या समस्या, घरकुल, रेशनिंग, सावकारी प्रकरणे या समस्यांचे तातडीने सोडवाव्या, या सर्व समस्या व त्यावर केलेल्या कार्यवाहीचा वेळोवेळी आढावा घेतला जाईल. वृत्तपत्रातून प्रकाशित होणार्या बातम्यांचीही संबंधित विभागाने गांभीर्याने दखल घ्यावी, त्यात मांडलेल्या समस्यांवरही कार्यवाही करावी, असेही त्यांनी सांगितले. जिल्हा नियोजनचा निधी वेळेत विकास कामांवर खर्च करण्याबाबत दक्षता घ्यावी. आगामी हिवाळी अधिवेशन काळात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली १२ डिसेंबर २0१७ रोजी होणार्या जिल्हय़ाच्या बैठकीसाठी लोकप्रतिनिधींनी दिलेल्या समस्या तसेच इतर कामांबाबतची सविस्तर माहिती तयार करण्याचेही डॉ. पाटील यांनी सांगितले. प्रारंभी पालकमंत्र्यांनी मागील लोकशाही दरबारात प्राप्त तक्रारींचा आढावा, त्यावर कोणती कार्यवाही करण्यात आली, याबाबतची माहिती घेतली. झालेल्या कार्यवाहीवर तक्रारदार समाधानी आहेत का, अशी विचारणा करून त्यांनी तक्रारी स्वीकारण्यास सुरुवात केली. तत्पूर्वी अकोला जिल्हय़ाच्या माहितीचा समावेश असणारी पुस्तिका आणि विकासाबाबत जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने तयार केलेल्या घडीपुस्तिकेचे प्रकाशन डॉ. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
घरकुल योजना तसेच सिंचन विहिर योजनेसंदर्भात जि.प.च्या सीईओंना तालुकानिहाय आढावा घेऊन या योजनेबाबत आलेल्या तक्रारींचे निराकरण करण्याचे निर्देश दिले आहेत. प्रत्येक लोकशाही दरबारात आलेल्या तक्रारींचा निपटारा होतो की नाही, याचा आढावा घेतला जात आहे. - डॉ. रणजित पाटील, पालकमंत्री अकोला