अकाेला : कोरोना संकटामुळे गेल्या लग्नसराईमध्ये अनेकांचा हिरमाेड झाला मात्र आता काेराेना नियमांचे पालन करून लग्नाच्या बंधनात अडकण्यास सज्ज झाले आहेत. काेराेनामुळे अनेकांच्या कुटुंबांची आर्थिक आघाडीवर स्थिती बिकट झाली आहे. त्यात कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे जुळलेले विवाह सोहळे पटकन, मोजक्या लोकांच्या उपस्थितीत, मर्यादित स्वरूपात आटोपते घेतले जात असल्याचे चित्र आहे आप्तस्वकीयांच्या उपस्थितीत लग्न करण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते. काेराेनामुळे मात्र या इच्छेवर विरजण पडले आहे. यावर्षी कोरोना संसर्गामुळे श्रीमंत, गरीब, सामान्य व सर्वच कुटुंबांसाठी विवाह सोहळा मर्यादित स्वरूपातील अर्थात ५० जणांच्या उपस्थितीचेच उरले आहेत. त्यामुळे विवाहाचे आमंत्रण, पाहुण्यांसाठी राबणे, त्यांचे रुसवे-फुगवे दूर करणे आदी काही ठिकाणी मनोरंजक, तर काही कुटुंबांमध्ये त्रासदायक ठरणारा हा उपक्रम यंदा तरी बाद झाला आहे. विशेष म्हणजे, काही व्यवसायांवरही कोरोनामुळे आतापर्यंत प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहेत. बिछायत केंद्र, कॅटरर्स संचालक, वाजंत्री मंडळी यांना परवानगी असली तरी त्यांच्यासकट ५० वऱ्हाडी कसे मोजायचे, हा प्रश्न उभा ठाकतो. त्यामुळे या अन्य छोट्या-मोठ्या व्यावसायिकांच्या उदरभरणावर यंदा कोरोनाने घाला घातला आहे.
तुळशी विवाहानंतर धामधूम वाढली
२६ नोव्हेंबरपासून तुळशी विवाहास प्रारंभ झाला. हा विवाह आटोपताच विवाहकार्य पार पाडण्याकडे विवाहेच्छुकांच्या कुटुंबीयांनी भर दिला आहे. मुलामुलींची पाहणी आटोपताच झटपट विवाह लावण्याचे बेत आखले जात आहेत. कोरोनामुळे मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत लग्नकार्य पार पाडले जात आहेत. विशेष म्हणजे, या विवाहांना खर्च जेमतेमच येत आहे.
सर्वाधिक मुहूर्त एप्रिल-मेमध्ये
२०२१ या नवीन वर्षात सर्वाधिक विवाह मुहूर्त एप्रिल व मे महिन्यात आहेत. एप्रिल महिन्यातील विवाहासाठी मुहूर्ताच्या तारखा २२, २४, २६. २७. २८. २९. ३० अशा अशा सात तारखा आहेत. मे महिन्यात १६ मुहूर्त आहेत. यात १. २, ७, ८, ९, १३, १४, २१, २२, २३, २४, २६, २८, २९ व ३० अशा तारखा आहेत. जिल्ह्यातील शेतीची पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबांमध्ये याच सुमारास लग्नसराईची धूम राहणार आहे. काही कुटुंबांमध्ये तुळशी विवाहाआधीच मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत बार उडविण्यात आला.
निर्जंतुकीकरणावर भर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंगल कार्यालयांमध्ये आयोजित सोहळ्यांमध्ये फिजिकल डिस्टन्सिंग, परिसराचे निर्जंतुकीकरण, सॅनिटायझरचा वापर यावर भर दिला जात आहे. कोरोनामुळे हे छोटेखानी विवाह समारंभ आनंदायी ठरल्याच्या प्रतिक्रिया मिळत असल्याचे कार्यालयांच्या संचालकांनी सांगितले.