मोबाइलवरूनच मिळविता येणार पास
कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांसाठी राज्य सरकारच्या वतीने युनिव्हर्सल ट्रॅव्हल ई-पासची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, आपल्या मोबाइलवरूनच ही पास मिळविता येणार आहे. ही पास मोबाइलमध्येच डाऊनलोड करून ठेवल्याने कोणत्याही प्रवासामध्ये तसेच मॉलमधील प्रवेशासाठी तिचा उपयोग होऊ शकतो. लोकल प्रवासाच्या पाससाठी ही पास लागणार असून, आपल्याकडे लोकल नसल्या तरी इतर हवाई, रेल्वे प्रवासासाठी त्याचा उपयोग होऊ शकणार आहे.
..अशी मिळवा युनिव्हर्सल ट्रॅव्हल ई-पास
- पात्र नागरिकांनी https://epassmsdma.mahait.org ही वेब लिंक उघडावी.
- त्यातील ‘ट्रॅव्हल पास फॉर व्हॅक्सिनेटेड सिटिझन्स’ यावर क्लिक करा.
- त्यानंतर आपला कोविड लसीकरणासाठी नोंदविलेलाच मोबाइल क्रमांक नमूद करावा. लगेचच मोबाइलवर ओटीपी अर्थात एकवेळ वापरासाठीचा पासवर्ड लघुसंदेश (एसएमएस) द्वारे प्राप्त होईल.
- हा ओटीपी नमूद केल्यानंतर लाभधारकाचे नाव, मोबाइल क्रमांक, लाभधारकाचा संदर्भ क्रमांक इत्यादी तपशील आपोआप समोर दिसतील.
- त्यामध्ये ‘पास निर्माण करा’ (जनरेट पास) या पर्यायावर क्लिक करावे.
- त्यावर क्लिक करताच अर्जदाराचा तपशील तसेच कोविड लसीचा पहिला आणि दुसरा डोस घेतल्याची दिनांक इत्यादी सर्व तपशील आपोआप दिसेल.
- या तपशीलमध्ये ‘सेल्फ इमेज’ या पर्यायामध्ये अर्जदाराने स्वतःचे छायाचित्र अपलोड करावे. ते मोबाईल गॅलरीतून अपलोड करता येवू शकते किंवा मोबाईल कॅमेराद्वारे जागीच छायाचित्र (सेल्फी) काढूनदेखील अपलोड करता येईल.
- ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढील २४ तासांमध्ये युनिव्हर्सल ट्रॅव्हल पासकरिता लघुसंदेश (एसएमएस)द्वारे लिंक प्राप्त होईल.
- लिंक प्राप्त झाल्यानंतर ई-पास मोबाइलमध्ये जतन (सेव्ह) करून ठेवावा.