अकोला: भांडवली मूल्यावर आधारित कर प्रणाली अंतर्गत अकोलेकरांवर तब्बल तीनपट कर आकारणीसाठी महापालिका सज्ज आहे. आयुक्त सोमनाथ शेटे यांनी शासनाकडे पाठविलेल्या प्रस्तावाला ९0 दिवसांचा कालावधी पूर्ण होत आला असून, सदर प्रस्तावाला मुर्त रूप देण्यासाठी आयुक्तांच्या स्वाक्षरीची गरज आहे. ३0 ऑगस्टपर्यंत आयुक्त रजेवर असले तरी प्रशासनाची वाटचाल लक्षात घेता, मूलभूत सुविधा उपलब्ध नसताना अकोलेकरांवर ही कर आकारणी लादली जाणार असल्याचे दिसून येत आहे. मनपा क्षेत्रातील मालमत्तांचे मागील १७ वर्षांपासून पुनर्मूल्यांकनच झाले नाही. यामुळे नव्याने निर्माण झालेल्या मालमत्तांना सुधारित कर आकारणी होऊ शकली नाही. त्याचा परिणाम महापालिकेच्या उत्पन्नावर झाला. मालमत्तांसोबतच नळ क नेक्शनधारकांचा शोध घेऊन त्यांना नियमानुसार पाणीपट्टी कर आकारणीची गरज आहे. यासाठी जीआयएस प्रणाली कार्यान्वित करण्याकरिता सत्तापक्षाने पुढाकार घेतला. मात्र जीआयएसच्या निविदा प्रक्रियेच्या फाइलमध्ये अधिकार्यांनीच तांत्रिक त्रुट्या काढल्याने ही प्रक्रिया थंड बस्त्यात आहे. प्रशासनाने मालमत्ता पुनर्मूल्यांकनाची मोहीम सुरू केली. दक्षिण झोन, पूर्व व आता उत्तर झोनमधील पुनर्मूल्यांकनाची प्रक्रिया आटोपल्यानंतर पश्चिम झोनमध्ये ही मोहीम सुरू होईल. एकीकडे प्रशासनाने मालमत्ता पुनर्मूल्यांकनाची मोहीम सुरू केली असतानाच, दुसरीकडे अकोलेकरांवर भांडवली मूल्यावर आधारित कर प्रणाली लागू करण्याचा प्रस्ताव मनपा आयुक्त सोमनाथ शेटे यांनी शासनाकडे पाठविला आहे. हा प्रस्ताव लागू झाल्यास अकोलेकरांवर तीनपट अधिक कर आकारणी लादली जाईल, हे निश्चित आहे.
तीनपट मालमत्ता कर आकारणीसाठी प्रशासन सज्ज
By admin | Published: August 25, 2015 2:52 AM