अकोला: नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गातील (ओबीसी) जिल्हा परिषदेच्या १४ व जिल्ह्यातील सहा पंचायत समित्यांच्या २४ सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाल्याने, या रिक्त जागांसाठी लवकरच निवडणूक घेण्यात येणार आहे. त्यानुषंगाने वंचित बहुजन आघाडीच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत आगामी निवडणुकीच्या मुद्द्यावर मंथन करण्यात आले. त्यामध्ये आपसातील हेवेदावे आणि गटबाजी बाजूला सारुन निवडणुकीच्या कामाला लागण्याचे ठरविण्यात आले.
‘ओबीसी ’ प्रवर्गातील जिल्हा परिषदेच्या १४ सदस्यांसह जिल्ह्यातील सहा पंचायत समित्यांच्या २४ सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाले आहे. त्यामुळे रिक्त झालेल्या जागांसाठी लवकरच निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता असल्याच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आगामी निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली. पक्षाच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांसह जिल्हा परिषद व पंचायत समित्यांचे पदाधिकारी व सदस्यांची बैठक ११ मार्च रोजी जिल्हा परिषद उपाध्यक्षांच्या शासकीय निवासस्थान परिसरात घेण्यात आली. त्यामध्ये आगामी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या रिक्त जागांसाठी घेण्यात येणाऱ्या निवडणुकीच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यात आली तसेच आपसातील हेवेदावे आणि गटबाजी बाजूला सारुन निवडणुकीच्या कामाला लागण्याचे या बैठकीत ठरविण्यात आले.वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डाॅ. धैर्यवर्धन पुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला प्रदीप वानखडे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभा भोजने, उपाध्यक्ष सावित्री राठोड, सभापती पंजाबराव वडाळ, गटनेता ज्ञानेश्वर सुलताने, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष प्रभा शिरसाट, सुशांत बोर्डे, गोपाल कोल्हे, अशोक शिरसाट, डाॅ. प्रसन्नजीत गवइ, काशीराम साबळे, पुष्पा इंगळे, प्रतिभा अवचार, वंदना वासनिक, संजय बावणे, शेख साबीर, सुभाष रौंदळे, ॲड.संतोष राहाटे,सुरेश शिरसाट, प्रा.सुरेश पाटकर, दिनकर खंडारे, पराग गवइ, संजय नाइक आदी उपस्थित होते.
सर्कलनिहाय उमेदवारांची
करणार चाचपणी !
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या रिक्त जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीकरिता जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सर्कल निहाय पक्षाच्या संभाव्य उमेदवारांची चाचपणी सुरू करण्याचे या बैठकीत ठरविण्यात आले.
..........................फोटो.....................