अकोला : ‘सर्वांना घरे’ ही शासनाची घोषणा असली, तरी ती कागदावरच ठेवली जात आहे. घरकुल योजना अंमलबजावणीनंतरही लाभार्थी मोठ्या प्रमाणात वंचित आहेत. त्यानुसार सर्वसाधारणसह इतरही लाभार्थींसाठी असलेली प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजनेसाठी पात्र ठरणाऱ्या लाभार्थींची नावे नमुना ड मध्ये समाविष्ट करण्यासाठी प्रत्येक गावात सर्वेक्षण सुरू झाले आहे.सर्वांनाच घरे, या संकल्पनेनुसार ग्रामीण आणि शहरी भागातील लाभार्थींसाठी प्रधानमंत्री आवास योजना सुरू झाली आहे. योजनेसाठी २०११ मध्ये झालेल्या आर्थिक, सामाजिक, जातीनिहाय सर्वेक्षणातून लाभार्थींची संख्या निश्चित झाली आहे. जिल्ह्यात एकूण ६७ हजार लाभार्थी पात्र आहेत. त्यापैकी चालू वर्षात ८,४२६ घरकुलांचा लक्ष्यांक देण्यात आला. जातीनिहाय सर्वेक्षणातील प्रपत्र ‘ब’ मध्ये शासनाने घरकुल योजनेसाठी पात्र लाभार्थी यादी आधीच तयार आहे. योजनेसाठी २०११ मध्ये झालेल्या आर्थिक, सामाजिक, जातीनिहाय सर्वेक्षणातून लाभार्थींना पात्र यादीत घेण्यासाठी सर्वेक्षण केले जाते. त्यानंतर यादीतील क्रमानुसार लाभार्थींना घरकुलासाठी पात्र ठरवले जाणार आहे.
- ‘रमाई’साठी हजारो लाभार्थी वंचितरमाई आवास योजनेतून जिल्ह्यात २००० घरकुल मंजूर आहेत. त्यामुळे हजारो लाभार्थींची बोंबाबोंब सुरू आहे. रमाई आवास योजनेतून घरकुलाचा लाभ घेण्यासाठी गावात स्वमालकीची जागा असल्याशिवाय तो मिळतच नाही. शेकडो लाभार्थी शासकीय जागेत राहतात. पूर्वी इंदिरा आवास योजनेतील घरकुलांमध्ये राहतात, त्यांनाही मालकीच्या जागेचा पुरावा मिळत नसल्याने वंचित ठेवले जात आहे. त्यामुळे प्रत्येक गावातील शेकडो लाभार्थी वंचित असल्याने जिल्ह्यातील संख्या हजारो आहे. सर्वेक्षणानंतरही त्यांना घरकुल मिळेल की नाही, ही बाब शंकास्पद आहे.