- संतोष येलकर
अकोला: प्रधानमंत्री आवास योजनेसह वेगवेगळ्या आवास योजनेंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागात ३८ हजार ९६३ घरकुल बांधकामांचे उद्दिष्ट असले तरी, त्यापैकी २८ जूनपर्यंत जिल्ह्यात १७ हजार ३९३ घरकुलांची कामे पूर्ण झाली असून, उर्वरित घरकुलांची कामे रखडली आहेत. घरकुल बांधकामांसाठी वाळू मिळत नसल्याने, घरकुलांची कामे पूर्ण करण्याचा प्रश्न लाभार्थींपुढे निर्माण झाल्याने, जिल्ह्यात घरकुल कामांची गती मंदावल्याचे वास्तव आहे.प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना आणि पारधी आवास योजनेंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागात ३८ हजार ९६३ घरकुल बांधकामांचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. त्यादृष्टीने जिल्ह्यात घरकुलांची कामे सुरू करण्यात आली असून, उद्दिष्टाच्या तुलनेत २८ जूनपर्यंत जिल्ह्यात १७ हजार ३९३ घरकुलांची बांधकामे पूर्ण करण्यात आली आहेत. उर्वरित घरकुलांची कामे सुरू करण्याची तयारी संबंधित लाभार्थींची तयारी असली तरी, गत फेबु्रवारी २०१९ च्या शासन निर्णयानुसार घरकुल बांधकामांसाठी जिल्ह्यात लाभार्थींना मोफत वाळू उपलब्ध होत नसल्याने, घरकुलांची कामे पूर्ण करणार तरी कशी, असा प्रश्न जिल्ह्यातील घरकुल लाभार्थींपुढे निर्माण झाला आहे. घरकुल बांधकामांसाठी वाळू मिळत नसल्याच्या स्थितीत जिल्ह्यात घरकुल बांधकामांची गती मंदावली आहे.जिल्हा परिषद अध्यक्षांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र!घरकुलांची कामे जलद गतीने पूर्ण करण्यासाठी तालुकानिहाय वाळूघाट उपलब्ध करून देण्याचा निर्णय फेबु्रवारी -२०१९ मध्ये शासनामार्फत घेण्यात आला; परंतु ही प्रक्रिया जिल्ह्यात राबविण्यात आली नसल्याने जिल्ह्यातील ग्रामीण भागात घरकुल लाभार्थींना घरकुल बांधकामासाठी सहजासहजी वाळू उपलब्ध होत नाही. त्यामुळे त्यामुळे घरकुल बांधकामांसाठी वाळूघाट राखीव करण्याची कार्यवाही तातडीने करण्याची मागणी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे यांनी २४ जून रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे केली आहे.