लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: गुडधी परिसरातील चाळीस क्वार्टरमध्ये रविवारी पार पडलेल्या लग्नात प्रचंड गोंधळांचा प्रकार घडला. येथे चतारे यांच्या घरी आयोजित लग्न सोहळ्यात ठाकरे नामक इसम हे तिसरे लग्न करणार असल्याची माहिती त्यांच्या पहिल्या पत्नी व मुलाला मिळाली या दोघांनीही सदर लग्न सोहळ्यात धाव घेऊन जाब विचारला; मात्र येथे काही लोकांनी ठाकरेंच्या पहिल्या पत्नीला व मुलाला मारहाण केल्याचा प्रकार घडला, त्यामुळे एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये रविवारी सायंकाळी परस्परांविरुद्ध तक्रार देण्यात आली असून, पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.चाळीस क्वार्टरमध्ये चतारे यांच्या घरी विवाह सोहळा होता. या विवाह सोहळ्यात कान्हेरी येथील रहिवासी ठाकरे यांना निमंत्रित करण्यात आले होते. या ठाकरेंचे आधीच दोन लग्न झाले आहेत. ते दूसऱ्या पत्नीसोबत लग्न सोहळयात हजर होते. या सोहळयात ते तिसरे लग्न करीत असल्याची माहिती त्यांच्या पहिल्या पत्नीला आणि मुलाला मिळाली, या दोघांनी सदर ठिकाणावर धाव घेऊन पाहणी केली; मात्र या ठिकाणी ठाकरे यांचा विवाहच सुरू नसल्याचे समोर आले. दरम्यान लग्न सोहळा बाजूला ठेवून या ठिकाणी प्रचंड गोंधळ सुरू झाला व ठाकरे यांच्या दूसऱ्या पत्नीसह काही मंडळीनी या दोन्ही मायलेकांना मारहाण केली. या गोंधळामुळे लग्नातील पाहूणे मंडळी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्यांनी परस्परांविरुद्ध तक्रार केली. यामध्ये ठाकरे यांनी मारहाणीची तक्रार केली असून, चतारे यांनी लग्नात निमंत्रण नसताना प्रवेश करून गोंधळ घातल्याची तक्रार केली.अल्पवयीन मुलीचे लग्न उधळल्याची चर्चाया ठिकाणी एका अल्पवयीन मुलीचे लग्न लावण्यात येत असल्याने हाणामारी झाल्याची चर्चा शहरात वाऱ्यासारखी पसरली; मात्र असा कुठलाही प्रकार नसल्याचे एमआयडीसी पोलिसांचे म्हणणे आहे. एका कुटुंबातील हा वाद असून, केवळ समज आणि गैरसमज तसेच अफवेमुळे हा प्रकार झाल्याची माहिती आहे. चाळीस क्वार्टर परिसरात सुरू असलेल्या लग्न सोहळ्यात कौटुंबिक वादातून हाणामारी झाली. या ठिकाणी कोणत्याही अल्पवयीन मुलीचे लग्न लावण्यात येत नव्हते, ही केवळ अफवा आहे. मुलगा, त्याची आई आणि वडील यांच्यातील हा वाद असून, परस्परांविरुद्ध तक्रार देण्यात आली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येणार आहे.-किशोर शेळके, ठाणेदार, एमआयडीसी पोलीस स्टेशन, अकोला.
‘चाळीस क्वार्टर’मधील लग्नात ‘गोंधळ’!
By admin | Published: May 22, 2017 1:56 AM