संजय उमक
मूर्तिजापूर : काही नियम व अटी ठेवून आठवी ते बारावीचे वर्ग १५ जुलैपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असला, तरी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा उघडण्यास मनाई दर्शविली आहे. तालुक्यातील घुंगशी येथील प्राथमिक शाळा याला अपवाद ठरली असून, १६ जुलै रोजी गटशिक्षणाधिकारी संजय मोरे यांनी दिलेल्या शाळा भेटीदरम्यान शाळेत विद्यार्थी उपस्थित होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद होत्या. शर्ती व अटींचे बंधन ठेवून १५ जुलैपासून माध्यमिक शाळा सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यासाठी गावात कोरोना बाधित रुग्ण नसावा, पालकांची संमती असावी व स्थानिक ग्रामपंचायतीचा ठराव असणे गरजेचे आहे. परंतु प्राथमिक शाळा सुरू करण्याचे शासनाचे कुठलेही आदेश नसताना तालुक्यातील घुंगशी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत १६ जुलै रोजी गटशिक्षणाधिकारी संजय मोरे यांनी दिलेल्या शाळा भेटीदरम्यान शाळेत विद्यार्थी उपस्थित असल्याने शैक्षणिक क्षेत्रात एकच खळबळ उडाली. दरम्यान, २८पैकी ७-८ विद्यार्थी उपस्थित असल्याची माहिती असून, त्यापैकी काही विद्यार्थ्यांनी मास्क लावलेले नसल्याचे फोटो सोशल मीडियावरील शैक्षणिक ग्रुपवर व्हायरल झाले आहेत. या फोटोमध्ये प्रभारी मुख्याध्यापक शैलेश गवई, सहाय्यक शिक्षक गोपाल लाजूरकर उपस्थित असल्याचे दिसून येते. सध्या ५० टक्के शिक्षकांची उपस्थिती असणे अनिवार्य आहे. या शाळेत ऑनलाईन पद्धतीने सेतू अभ्यासक्रम सुरू असून, विद्यार्थ्यांना पीडीएफ प्रती देण्यासाठी शाळेत बोलावल्याचे मुख्याध्यापक शैलेश गवई यांचे म्हणणे आहे. परंतु सर्व शैक्षणिक पत्रके, शैक्षणिक साहित्य व गृहपाठ विद्यार्थ्यांना गृहभेटीदरम्यान शिक्षकांनी द्यायचा असतो, असे असताना विद्यार्थ्यांना नियमबाह्यरित्या शाळेत कशासाठी बोलावले, हाच मोठा प्रश्न आहे.
-------------
शाळा सुरू असून, ५० टक्के शिक्षकांची उपस्थिती आहे. शाळेत शिक्षक दिसले, की रोज २-४ विद्यार्थी येतात. शिक्षक त्यांना काही सूचना व अभ्यासक्रम देतात. त्यानंतर विद्यार्थी निघून जातात. शिक्षकांच्या प्रेमापोटी विद्यार्थी शाळेत आले होते.
-संजय मोरे, गटशिक्षणाधिकारी, पं. स. मूर्तिजापूर.