दाेन मारेकऱ्यांनी केला पाठलाग
गाेपाल अग्रवाल यांचा दाेन मारेकऱ्यांनी बाेरगाव मंजू येथूनच पाठलाग केल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली. अप्पू पाॅइंटजवळ आल्यानंतर मारेकऱ्यांनी दुचाकी अडवून त्यांच्यावर हल्ला चढविला. मात्र, यामधून स्वत:ला वाचवित गाेपाल यांनी एमआयडीसीकडे पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु, जखमी असलेल्या गाेपाल यांच्यावर गाेळी झाडल्यानंतर ते खाली काेसळताच, पुन्हा ताेंडात आणि छातीवर गाेळी झाडली, तर दाेन जिवंत काडतुसे घटनास्थळावर आढळली. दाेन मारेकऱ्यांनी पाठलाग करून अग्रवाल यांची हत्या केल्याची चर्चा घटनास्थळावर सुरू हाेती.
रुग्णालयात दाखल करणारे ते काेण?
गाेपाल अग्रवाल रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका खड्ड्याजवळ गंभीर जखमी अवस्थेत पडलेले असताना त्यांना रुग्णालयात आणण्यात आले. अग्रवाल अंधारात जखमी अवस्थेत असल्याची माहिती कशी झाली आणि त्यांना रुग्णालयात कुणी आणले, हे स्पष्ट हाेत नसल्याने पाेलिसांनी आता त्या दिशेने तपास सुरू केला आहे. त्यांची दुचाकीही घटनास्थळावर आढळली नाही. त्यामुळे दुचाकी गायब करून अग्रवाल यांना रुग्णालयात नेल्याची चर्चा आहे.
तासभर पाेलीसही अनभिज्ञ
या घटनेची माहिती बराच वेळ पाेलिसांनाही नव्हती. एमआयडीसी पाेलिसांसह सर्व पाेलीस यंत्रणा कामाला लागली. मात्र, तब्बल एक तासभर त्यांना घटनास्थळ दिसले नाही. यावरून गाेळ्या झाडून दुचाकी व मृतदेह रुग्णालयात नेईपर्यंत हे सर्व गाेपनीय राहिल्याने यामध्ये पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न झाल्याची माहिती आहे.
दाेन लाखांची रक्कम गायब
मृत गाेपाल अग्रवाल यांच्याकडे असलेल्या बॅगमध्ये दाेन लाख रुपयांची राेकड हाेती. मात्र, ती बॅग आणि राेकड गायब असल्याची माहिती पाेलिसांनी दिली. यावरून हे प्रकरण लूटमारीचे असल्याची चर्चा हाेती. मात्र, स्पष्ट कारण अद्यापही समाेर आले नसून पाेलीस आता तपास करीत आहेत.
हत्याकांडाला अनेक कंगाेरे
गाेपाल अग्रवाल यांची हत्या नेमकी कुठल्या कारणाने झाली, हे स्पष्ट झाले नसले तरी त्यांच्या हत्येला अनेक कंगाेरे असल्याची माहिती आहे. दाेन लाखांच्या लूटमारीसाठी हे हत्याकांड झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. मात्र, गाेपाल आणि त्यांचे मित्र पार्टी करीत असताना त्यांच्यात वाद झाला आणि वाद वाढल्यानंतर संतापलेल्या काहींनी हे हत्याकांड घडविल्याची दुसरीही किनार समाेर येत आहे. गाेपाल यांचा वाढदिवस असल्याचीही चर्चा असून, या वाढदिवसाच्या कारणावरून वाद हाेऊन त्यांचा पूर्ववैमनस्यातून खून केल्याची माहिती आहे.