- संतोषकुमार गवईशिर्ला : अकोला पातुर रोडवरील चिखलगाव येथील सम्यक जिनिंग-प्रेसिंग फॅक्टरीला भीषण आग लागून, अंदाजे दोन कोटी रुपयांचा काूपूस, सरकी व कापसाच्या गठाणी जळून खाक झाल्याची घटना मंगळवार, २६ मे रोजी पहाटे घडली. यावेळी काम करीत असलेल्या ४५ मजुरांचे प्राण सुदैवाने वाचले. आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले आहे.वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या संस्थेच्या सम्यक जिनिंग-प्रेसिंग ला सकाळी चार वाजता आग लागली तेव्हा ४५ मजूर फॅक्टरीत काम करत होते. सुदैवाने या सर्वांचे प्राण वाचले. सदर फॅक्टरीमध्ये जिनिंग प्रेसिंगचे काम ४८ स्पिन मशिन वर सुरू होते. कापूस वाहकपट्ट्यावर घर्षण होऊन ठिणगी उडाल्याने आग लागली असावी, असा अंदाज व्यवस्थापक भारती इंगळे तथा जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रविण लोखंडे यांनी लोकमतकडे व्यक्त केला. यासंदर्भात सीसीआयची महाव्यवस्थापक अजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार चार हजार क्विंटल कापूस, २००० क्विंटल सरकी आणि ५० ते ६० कापसाच्या गठाणी आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या असाव्या असा प्राथमिक अंदाज त्यांनी व्यक्त केला. दुपारनंतर विमा कंपनी सर्वेक्षणासाठी दाखल होणार आहे अशी माहिती त्यांनी दिली. घटनास्थळी प्रस्तुत प्रतिनिधीने भेट दिली असता सम्यक जिनिंग प्रेसिंग फॅक्टरी मधून प्रचंड प्रमाणात धूर निघत होता. आग विझवण्याचे काम पातुर नगरपरिषदेचा एक बंब आणि अकोला महानगरपालिकेचे दोन बंब आणि जिनिंग-प्रेसिंग चा एक ट्रॅक्टर ठेवण्याचे काम सकाळी ५.१५ वाजता पासून करीत असल्याची माहिती व्यवस्थापक भारती इंगळे यांनी दिली. सहकारी तत्त्वावरील संमेक जिनिंग प्रेसिंग हे अकोला जिल्ह्यातील सर्वात मोठे युनिट होते. याठिकाणी दहा ते अकरा हजार क्विंटलहून अधिक कापसाची खरेदी करण्यात आली होती. सदर फॅक्टरीला आग लागल्यामुळे येथील खरेदी आजपासून थांबली आहे. त्यामुळे कापूस खरेदीचा तान अधिक वाढणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक डॉक्टर प्रविण लोखंडे यांनी दिली. घटनेची माहिती समजताच सम्यक जिनिंग प्रेसिंग चे अध्यक्ष प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर यांनी भेट देऊन पाहणी केली.