कविता बायस्करला दोन दिवसांची पोलीस कोठडी
अकोला : जुन्या आरटीओ रोडवरील गिरी नगरातील स्वप्नशिल्प अपार्टमेंटमध्ये जन्मदात्या आईची मुलीने केवळ एक लाख रुपयांसाठी हत्या केल्याचे आता उघड झाले आहे. या हत्याकांड प्रकरणातील आरोपी कविता बायस्कर हिला पोलिसांनी अटक करून शुक्रवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने तिला १४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
स्वप्नशिल्प अपार्टमेंट येथे सरुबाई काशिनाथ कांडेलकर वय ६१ वर्षे या राहात होत्या. तीनच मुली असल्याने पतीचे निधन झाल्यानंतर त्यांनी शेतीवाडी व इतर प्रॉपर्टी त्यांच्या तीनही मुलींना वाटप केली. यामधील कविता दिनकर बायस्कर (वय ४० वर्ष) हिला एका शेतजमिनीतील सात गुंठे हिस्सा अधिकचा मिळाला होता. त्यामुळे सरूबाई कांडेलकर यांनी कविताकडे एक लाख रुपयांची मागणी केली. सरुबाई यांनी जळगाव जिल्ह्यात घर घेतल्यामुळे त्या अडचणीत होत्या. त्यामुळेच मुलगी कविता हिच्याकडे त्यांनी एक लाख रुपयांची मागणी केली होती. यावरूनच दोघींमध्ये वाद झाले. याच वादातून बुधवारी सायंकाळी कविता बायस्कर हिने आई सरूबाई कांडेलकर यांचे डोके घरातील पाट्यावर जोरजोरात आदळून त्यांची हत्या केली होती. या हत्येनंतर कविता बायस्कर हिने किरकोळ वादातून आई जमिनीवर कोसळून त्यांचा मृत्यू झाल्याचा बनाव पोलिसांसमोर केला. मात्र, रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह पाहून पोलिसांना आधीच कविता दिनकर बायस्कर हिच्यावर संशय होता. त्यानुसार पोलिसांनी कविताला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता तिने एक लाख रुपयांसाठी हे हत्याकांड केल्याची कबुली दिली. पोलिसांनी तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तिला शुक्रवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपी कविताला १४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
बनाव पोलिसांसमोर उघड
आई जमिनीवर कोसळून डोक्याला मार लागल्याने तिचा मृत्यू झाल्याचा बनाव कविता दिनकर बायस्कर हिने सुरुवातीला केला होता. मात्र, पोलिसी खाक्या दाखविताच तिने आईची हत्या केल्याची कबुली दिली. यावरून कविता बायस्कर हिचा बनाव २४ तासांच्या आतच पोलिसांसमोर उघड झाला.