अकोला : रुबेला, गोवर लसीकरण मोहिमेदरम्यान शुक्रवारी अकोट शहरातील एका शाळेत लसीकरणानंतर एक विद्यार्थिनी अचानक चक्कर येऊन खाली पडल्याने एकच खळबळ उडाली. प्रकृती गंभीर असल्याने विद्यार्थिनीला जिल्हा सर्वोपचार रुग्णालयातील अतिदक्षता कक्षात दाखल करण्यात आले. त्या विद्यार्थिनीची प्रकृती सुधारली असून, घाबरण्याचे कारण नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले.प्राप्त माहितीनुसार, अकोट येथील सेंट पॉल अॅकॅडमी शाळेत शुक्रवारी रुबेला, गोवर लसीकरण मोहिमेस सुरुवात करण्यात आली. दरम्यान, इयत्ता दहावीतील एक विद्यार्थिनी लसीकरणानंतर अचानक चक्कर येऊन खाली पडली. घटनेमुळे शाळा परिसरात एकच खळबळ पसरली. विद्यार्थिनीची प्रकृती गंभीर होत चालल्याने डॉक्टरांनी तिला तत्काळ सर्वोपचार रुग्णालयातील अतिदक्षता कक्षात दाखल केले. त्यावेळी सर्वप्रथम तिचा सीटी स्कॅन काढण्यात आला. त्याचा अहवाल सामान्य आल्याने पालक व डॉक्टरांच्या जीवात जीव आला; परंतु रक्ताच्या नमुन्यांचा अहवाल अद्याप आला नाही. त्यामुळे लसीकरणामुळे हा प्रकार घडल्याची शक्यता नाकारता येत नाही. विद्यार्थिनीच्या प्रकृतीत सुधारणा होत असून, घाबरण्याचे कारण नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.चक्कर आल्यास घाबरू नका...गोवर, रुबेला लसीकरणानंतर विद्यार्थ्यांना चक्कर येणे, खाज सुटणे, मळमळ होणे अशा किरकोळ समस्या येतात; परंतु त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ही लस पूर्णत: सुरक्षित असून, त्याचा आरोग्याला कुठल्याच प्रकारचा धोका नसल्याचेही आरोग्य विभागाने स्पष्ट केले.लसीकरणाला पर्याय नाही...बाळाला जन्मत: येणारं अंधत्व, बहिरेपणा तसेच डायरिया, निमोनिया यासारख्या आजारांना टाळायचं असेल, तर त्यावर रुबेला, गोवर लसीकरणाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.
लसीकरणानंतर विद्यार्थिनीला चक्कर आल्याने तिला तत्काळ सर्वोपचारमध्ये हलविण्यात आले. तिच्यावर उपचार सुरू असून, घाबरण्याचे कारण नाही. काही तपासणी अहवाल सामान्य आले आहेत. काही तपासण्यांचे अहवाल यायचे आहेत. २० दिवसांपूर्वी त्या विद्यार्थिनीला टायफॉइड असल्याचे तिच्या पालकांनी सांगितले होते, तसेच यापूर्वीदेखील तिची प्रकृती बिघडल्याचे पालकांनी सांगितले आहे.- डॉ. आरती कुलवाल, जिल्हा शल्यचिकित्सक.