अकोला : जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील तीन मुलींना शिक्षणासाठी मदत म्हणून मुंबई येथील रुणमयी ट्रस्टच्यावतीने प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या धनादेशाचे वितरण जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले.यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, निवासी उपजिल्हाधिकारी राम लठाड, रुणमयी ट्रस्टचे धनंजय महाडीक उपस्थित होते. शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील पातूर तालुक्यातील सायवानी येथील मयूरी ताले, बार्शीटाकळी तालुक्यातील राजनखेड येथील रेश्मा सुरेश राठोड व अकोला तालुक्यातील म्हातोडी येथील कृतिका भांडे या तीन मुलींना शिक्षणासाठी मदत म्हणून प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या धनादेशाचे वितरण जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते करण्यात आले. शिक्षणासाठी देण्यात आलेल्या मदतीचा उपयोग संबंधित विद्यार्थ्यांना होणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे संदीप साबळे, दत्ता जुंबळे व शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबीय उपस्थित होते.