अकोला : महाविद्यालयीन शिक्षणानंतर युवकांना ध्यास नोकरीचा लागतो , आजच्या स्पर्धेच्या युगात रोजगार प्राप्तीसाठी अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागते असा असंख्य तरुणांचा अनुभव आहे. तरीही आपल्यातील कला गुणांना वाव देण्यास योग्य संधी मिळावी असा रोजगार प्राप्त करण्यासाठी युवक - युवतीनी शिक्षणासोबत विविध कौशल्याचे प्रशिक्षण घ्यावे असे प्रतिपादन पालकमंत्री तथा कौशल्य विकास व उद्योजकता राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी केले.स्वयंरोजगाराच्या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टिने सुशिक्षीत बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजगता विभागाच्या वतीने रोजगार मेळाव्याचे आयोजन २९ जानेवारी रोजी राधादेवी गोयनका महिला महाविद्यालय येथे करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी भारतीय सेवा सदनचे अध्यक्ष दिलीपराज गोयनका, राधादेवी गोयनका महिला महाविदयालयाचे प्राचार्य देवेंद्र व्यास, खंडेलवाल ज्वेलर्सचे नितीन खंडलेवाल, पॅडसन्स इंडस्ट्रीजच्या अपुर्वा पडगीलवार, आर. के.टेक्नॉलाजीच्या रेखा अरंविद देठे, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजगता विभागाचे सहाय्यक संचालक दत्ता ठाकरे, एल. आय. सी.चे शाखा व्यवस्थापक निखील देशपांडे, निर्माण स्कॅन्स प्रायव्हेट लिमीटेडचे गणेश देशमुख, ओझोनचे दिपक दानडे, आश्लेषा पॉवरचे अखिलेश बोरा यांची प्रमुख उपस्थिती होती. देशातील एकूण लोकसंख्येच्या ६० टक्के लोकसंख्या ही चाळीशीच्या आत आहे. तसेच देशाची ५० टक्के लोकसंख्या महिलांची आहे. स्त्री शक्तीला योग्य व्यासपिठ मिळाले तर देशाच्या विकासासाठी हि स्त्रीशक्ती कामी येवू शकते हा विचार करून देशाच्या बांधणीसाठी काम करीत असतांना स्त्रीयांनी शिक्षणासोबत कौशल्य निर्माण करावे, असे आवाहन पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी केले. प्रशिक्षण घेतांना प्रशिक्षणाचा सर्व खर्च शासन करणार आहे. याचा लाभ युवतींनी घ्यावा असेही ते म्हणाले. मोबाईलचा वापर कमी करावा हे पथ्य पाळावे असे ते म्हणाले.