वान धरणातून बाळापूर मतदारसंघातील ६९ गावांमधील नागरिकांसाठी दिल्या जाणारा ४ दलघमी पाणी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. ६९ गावांमध्ये बहुतांश भागाचा खारपाणपट्ट्यात समावेश हाेत असल्याने ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत असल्याची परिस्थिती आहे. दुसरीकडे तेल्हारा तालुक्यात काही राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांनी वान धरणातील पाण्याचा एक थेंबही देणार नसल्याची भूमिका घेतली आहे. अशा वातावरणात आता शिवसेनेने तत्कालीन भाजप,सेना युतीच्या कालावधीत ‘अमृत’अभियान अंतर्गत अकाेलेकरांसाठी मंजूर करण्यात आलेल्या २४ दलघमी पाणी आरक्षणाचा प्रलंबित तिढा निकाली काढण्याची मागणी केली आहे. सेनेचे शहर प्रमुख (अकाेला पश्चिम)तथा गटनेता राजेश मिश्रा यांनी वान धरणातून आरक्षित केलेल्या २४ दलघमी पाण्याचा पुरवठा करण्याची मागणी केली आहे. मिश्रा यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांच्यासह भाजप व सेनेच्या लाेकप्रतिनिधींना पत्राद्वारे साकडे घातले आहे. राजेश मिश्रा यांच्या पत्रामुळे विविध राजकीय पक्षातील अनेकांची काेंडी हाेणार असून शहराच्या पाणीपुरवठ्यासंदर्भात काेण पुढाकार घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पाणी आरक्षणाचा मुद्दा तापणार
नाेव्हेंबर २०२१ मध्ये नगरपरिषद, नगर पालिकांच्या निवडणुका पार पडतील. त्यापूर्वी अकाेला,बुलडाणा व वाशिम मधील स्थानिक स्वराज्य संस्थेची(विधान परिषद) निवडणूक हाेईल. या दाेन्ही निवडणुकीत व त्यानंतर २०२२ मधील मनपाच्या सार्वत्रिक निवडणुकीत शहरासाठी आरक्षित केलेल्या पाण्याचा मुद्दा चांगलाच तापणार असल्याचे संकेत आहेत.