अकाेला : कोविडमुळे विधवा झालेल्या महिलांचा शोध घेऊन त्यांना शासनाच्या संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना व राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत पात्र असणाऱ्या महिलांना लाभ द्या. तसेच दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना बालसंगोपन योजनेंतर्गत त्यांचे पालनपोषण, यथायोग्य संरक्षण व संगोपन करण्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिला.
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या दालनात कृती दलाची आढावा बैठक बुधवारी पार पडली. यावेळी महिला व बालविकास अधिकारी विलास मरसाळे, बालकल्याण समितीच्या अध्यक्ष सौ. पल्लवी कुळकर्णी, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी राजू लाडुलकर, परिविक्षा अधिकारी आशिष देऊळकर, संरक्षण अधिकारी सुनील सरकटे, सुनील लाडुलकर, हर्षाली गजभिये, विधी सेवा प्राधिकरणचे राजेश देशमुख आदी उपस्थित होते.
महिला व बालविकास विभागाने
काेविडमुळे पालक गमावलेल्या बालकांविषयी माहिती संकलित केली असून, ५० वर्षांच्या वयोगटाखालील कोविडमुळे मृत्यू झालेल्या १६० कुटुंबांशी संपर्क साधण्यात आला. त्यापैकी ३५ कुटुंबांमध्ये १८ वर्षांखालील ७४ बालकांचा शोध घेण्यात आला. त्यापैकी ५६ बालके हे बालसंगोपन योजनेसाठी पात्र ठरले आहेत. पात्र असलेल्या बालकांना बालसंरक्षण योजनेंंतर्गत लाभ देण्यात येणार आहे. कोविडमुळे विधवा झालेल्या महिलांचा शोध घेऊन त्यांचे पुनवर्सन करणे आवश्यक आहे. अशा विधवा महिलांना शासनाच्या योजनांचा लाभ प्राधान्याने देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी कृती दलाच्या बैठकीत दिले.