लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : राज्यावर पावणेचार लाख कोटींचे कर्ज असतानाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी कौतुकास्पद असल्याचे सांगतानाच, शासनाने ३० जून १०१७ पर्यंत थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांनाही या कर्जमाफीचा लाभ द्यावा, तसेच दुबार पेरणीचे संकट ओढवलेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी शिवसंग्रामच्यावतीने मुख्यमंत्र्यांकडे केली जाणार असल्याची माहिती शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष तथा शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आमदार विनायकराव मेटे यांनी शुक्रवारी येथे दिली.शिवसंग्रामची आढावा बैठक घेण्यासाठी येथे आलेल्या विनायकराव मेटे यांनी स्थानिक विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत बातमीदारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पावसाच्या दडीमुळे शेतकऱ्यांवर ओढवलेल्या दुबार पेरणीच्या संकटासह अलीकडे देण्यात आलेल्या कर्जमाफीवर भाष्य केले. राज्यातील बहुतांश भागात पेरण्या आटोपल्या असल्या, तरी पावसाने दडी मारल्यामुळे शेतीचे चित्र विदारक आहे. विदर्भातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट घोंगावत आहे. येत्या चार-पाच दिवसांत पाऊस आला नाही, तर पेरण्या उलटण्याची शक्यता आहे. या पृष्ठभूमीवर शासनाने महसूल खात्यामार्फत सर्वेक्षण करून, शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते व पेरणीच्या मजुरीसह खर्चाचा हिशेब तयार करावा. वेळ पडल्यास शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची तयारी शासनाने ठेवावी. तसे आदेश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला द्यावे, अशी मागणी आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचे मेटे यांनी सांगितले. सरकारने वर्ष २००९ पासून ते ३० जून २०१६ पर्यंत थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली आहे. आधी २०१२ पर्यंतच्या थकबाकीदारांना कर्जमाफीसाठी पात्र ठरविणाऱ्या शासनाने हा अवधी २००९ पर्यंत वाढविला. हा निर्णय कौतुकास्पदच आहे. त्याचवेळी शासनाने ३१ जून २०१७ पर्यंत थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ द्यावा, तसेच तो सरसकट सर्व शेतकऱ्यांना द्यावा, अशी मागणीही मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे मेटे यांनी सांगितले.पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी पाकिस्तानचे नाहीतसरसकट सर्वांनाच कर्जमाफीमुळे पश्चिम महाराष्ट्रातील धनदांडग्या शेतकऱ्यांना लाभ होणार असल्याची ओरड होत आहे. या विषयावर बोलताना पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी हे पाकिस्तानातील आहेत का, असा प्रतिप्रश्न मेटे यांनी केला. शेतकऱ्यांबाबतचे धोरण ठरविताना प्रादेशिक भेदभाव होता कामा नये, असे ते म्हणाले.शिवसेना, शिवसंग्रामच्या भूमिकेत फरकशेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याबाबत शिवसेनेने घेतलेल्या भूमिकेत आणि शिवसंग्रामच्या भूमिकेत फरक असल्याचे मेटे यांनी स्पष्ट केले. आमची भूमिका भांडायची नव्हे, तर शेतकऱ्यांच्या सर्व समस्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडायच्या व त्यांचे समाधान करून घ्यायचे, अशी असल्याचे मेटे यांनी सांगितले.
चालू वर्षातील थकबाकीदारांनाही कर्जमाफीचा लाभ द्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2017 2:16 AM